Atpadi News Today |आटपाडी (सांगली) : आटपाडी-भिवघाट रस्त्यावर सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. भरधाव चारचाकीने प्रथम दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोरदार धडक दिल्याने गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.
हा अपघात सायंकाळी साडेसातच्या सुमारास भिंगेवाडी शिवारात घडला. फिरोज लतीफ सय्यद हे सिद्धनाथ मंदिराजवळ दुचाकीवर थांबलेले असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत ते जखमी झाले. अपघातानंतर चालकाने गाडी आणखी वेगाने चालवत भिंगेवाडी परिसरात ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉलींमध्ये गाडी घुसवली.
धडकेत गाडीतील प्रवासी वसंत उत्तम यादव (वय ४३) आणि आर्यन मोहिते (वय १८, रा. कालेटेक, कराड) यांचा जागीच मृत्यू झाला. चारचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे पुढील चाक तुटून निखळले. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढून आटपाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
🔴 हेही वाचा 👉 कवठेमहांकाळ येथील तोतया अधिकार्यांच्या आयकर छापा प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती.