Sangli News | सांगली : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद २०२५ मध्ये देशभरातील शासकीय संस्थांना डिजिटल गव्हर्नन्स क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले. यामध्ये सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. विशाल सविता तेजराव नरवाडे (भा. प्र. से.) यांना सुवर्ण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा सन्मान केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि विशाखापट्टणमचे खासदार मुथुकुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
ग्रामीण स्वराज्य संस्थांसाठी पहिला पुरस्कार
या वर्षीच्या परिषदेत पहिल्यांदाच ग्रामपंचायतींसाठी स्वतंत्र पुरस्काराची श्रेणी जाहीर झाली. त्यात धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीने देशभरातून अव्वल स्थान मिळवत सुवर्ण पुरस्कार पटकावला. विशेष म्हणजे सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विशाल नरवाडे सांगलीत येण्यापूर्वी धुळे जिल्ह्याचे सीईओ म्हणून कार्यरत होते.
पुरस्काराचे स्वरूप
या सुवर्ण पुरस्कारामध्ये १० लाख रुपये रोख पारितोषिक, मानाची ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्राचा समावेश आहे. हा सन्मान मिळाल्याने विशाल नरवाडे यांच्या शासकीय कार्यकिर्दीत एक मानाचा तुरा जोडला गेला आहे.
रोहिणी ग्रामपंचायतीतील डिजिटल उपक्रम
विशाल नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली रोहिणी ग्रामपंचायतीने डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने अनेक महत्त्वाची पाऊले टाकली. त्यामध्ये :
अधिकृत वेबसाईटद्वारे संपूर्ण ऑनलाइन सेवा वितरण
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित आधुनिक अंगणवाडी
“माझी पंचायत ॲप” द्वारे तक्रार निवारण
“निर्णय ॲप”द्वारे ग्रामसभा निर्णयांचे ऑनलाइन प्रकाशन
डिजिटल साक्षरतेसाठी गावात आयसीटी लॅब
अशा विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे ग्रामपंचायतीत पारदर्शकता, जबाबदारी आणि नागरिक समाधान यामध्ये लक्षणीय प्रगती झाली. त्यामुळे रोहिणी ग्रामपंचायत देशभरात डिजिटल मॉडेल म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.
हेही वाचा: इस्लामपूर अपघातातील जखमी पेठच्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू.