सांगली : भेसळखोर व प्रतिबंधित अन्नपदार्थ उत्पादक-विक्रेत्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष कारवाईअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) विशेष भरारी पथकाने सांगली जिल्ह्यात तीन दिवसांत मोठी धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल ₹1 कोटी 23 लाख 85 हजार 640 रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू व पानमसाल्याचा साठा जप्त करण्यात आला असून 12 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार आणि अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष भरारी पथकाच्या माध्यमातून भेसळखोरी व प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साखळीवर कठोर कारवाई सुरू आहे. या अंतर्गत दि. 9 ते 12 जानेवारी 2026 या कालावधीत सांगली जिल्ह्यात नियोजनबद्ध पद्धतीने तपासणी व कारवाया करण्यात आल्या.
मगरमच्छ कॉलनी परिसरात कारवाई
सांगलीतील मगरमच्छ कॉलनी परिसरात वाहन क्रमांक MH 10 CR 6460 वर कारवाई करून विक्रीसाठी वाहतूक करण्यात येत असलेला प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पानमसाला जप्त करण्यात आला. या कारवाईत सुमारे ₹24.90 लाखांचा तंबाखू-पानमसाला साठा व ₹6 लाखांचे वाहन असा एकूण ₹30.90 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित साठा व वाहन सील करण्यात आले आहे.
मिरज–म्हैसाळ रोडवर दुसरी मोठी कारवाई
तसेच मिरज–म्हैसाळ रोडवर वाहन क्रमांक KA 13 C 8074 वर कारवाई करून ₹76.95 लाखांचा प्रतिबंधित तंबाखू-पानमसाला साठा व ₹16 लाखांचे वाहन असा एकूण ₹92.95 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात खरेदीदार, वाहतूकदार, पुरवठादार व उत्पादक अशा 7 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तीन दिवसांत कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त
या तीन दिवसांच्या कारवाईत एकूण ₹1.23 कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मोहिमेत FDA सांगली चे अन्न सुरक्षा अधिकारी व संबंधित पथकाने सक्रिय सहभाग घेतला असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रशासनाकडून भेसळखोरी व प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीविरोधात पुढेही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा: सांगली पशुसंवर्धन विभागामुळे वाचले रानगव्याचे प्राण.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









