सांगली : जिल्ह्यात बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त आणि पारदर्शक पार पडण्यासाठी जिल्हा परिषदेने तंत्रज्ञानाधारित नावीन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे. यंदा प्रथमच सांगली जिल्ह्यात बारावीच्या परीक्षांवर जिल्हा परिषद स्तरावरून झूम लिंकद्वारे थेट देखरेख ठेवण्यात येत असून, राज्यात असा प्रयोग प्रभावीपणे राबवणारा सांगली हा पहिला जिल्हा ठरला आहे.
जिल्ह्यातील ५२ परीक्षा केंद्रांवरील १३०७ वर्गखोल्यांमध्ये सुरू असलेल्या परीक्षांवर जिल्हा परिषदेतून निरीक्षण केले जात आहे. प्रत्येक परीक्षा कक्षातील हालचालींचे लाईव्ह रेकॉर्डिंग करण्यात येत असून हे चित्रीकरण परीक्षेच्या संपूर्ण कालावधीत सुरक्षित ठेवले जाणार आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात ३२ हजार ५०४ परीक्षार्थी बसले आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी सांगितले की, परीक्षांमध्ये ‘कॉपी होणारच’ असा नकारात्मक दृष्टिकोन बदलणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांवर थेट कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांना सुधारण्याची संधी देण्यावर भर देण्यात येणार असून कोणाचेही शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, ही प्रशासनाची भूमिका आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी सांगितले की, कॉपीमुक्त परीक्षा धोरणांतर्गत परीक्षा केंद्रांवर प्रवेशावेळी तपासणी, वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही, पर्यवेक्षकांना मोबाईल वापरास मनाई आणि भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या केंद्रांवर सीसीटीव्ही सुविधा उपलब्ध नाही, त्यासाठी विशेष भरारी पथक तैनात करण्यात आले आहे.
परीक्षेच्या पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर शांततेत पार पडला. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षण विभाग, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक आणि प्रशासन समन्वयाने काम करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही डिजिटल देखरेख व्यवस्था बारावी व दहावीच्या परीक्षांसाठी लागू राहणार असून, १८ मार्चपर्यंत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









