जत : स्वस्त दरात सोने मिळवून देण्याचे आमिष दाखवून जत शहरातील एका तरुणाची तब्बल ८ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. पीडिताच्या तक्रारीनुसार, आरोपींनी डिजिटल ट्रान्सफर आणि रोख रक्कम घेतल्यानंतर ना सोने दिले, ना पैसे परत केले. त्यानंतर पाच जणांविरोधात जत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शंकर कॉलनीतील वशिम जहांगीर शेख यांनी पोलिसांकडे दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुमित संपत गायकवाड, संपत बाबूराव गायकवाड, सुनीता संपत गायकवाड, नीशा रमेश गायकवाड आणि अक्षय मधुकर हसबे (सर्व रहिवासी — रोहिणी ज्वेलर्स, दिघी, पुणे) यांनी 2022 मध्ये पीडिताशी संपर्क साधून “बाजारभावापेक्षा कमी दरात सोने देऊ” असे सांगितले.
त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून शेख यांनी जून ते डिसेंबर 2022 या काळात डिजिटल ॲप आणि रोख स्वरूपात लाखो रुपये दिले. मात्र देय तारखा उलटून गेल्यानंतरही सोने देण्यास आरोपी टाळाटाळ करत राहिले. उलट पैसे परत मागितल्यावर “याबाबत तोंड उघडले तर जीवे मारू” अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.
तक्रारीनंतर जत पोलिसांनी पाचही आरोपींवर फसवणूक व धमकीचे गुन्हे नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व चिंतेचे वातावरण आहे.



