Sangli Today | सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जवळ येत असताना जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गटा) चे नेते आमदार जयंत पाटील यांनी व्हॉट्सॲपवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
या फोटोमध्ये आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील एकत्र बसलेले दिसत आहेत. “आता एकच लक्ष्य – सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका” असा संदेश या फोटोसोबत देण्यात आला असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अलीकडेच झालेल्या उरण ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटा) ने जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता मिळवली, तर पलूस नगरपरिषदेत काँग्रेसने आमदार विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला. या निकालांमुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे मनोबल वाढले असून, त्याचे प्रतिबिंब आता सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या राजकारणात दिसू लागल्याची चर्चा आहे.
महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम आधीच जाहीर झाला असून, उमेदवार निश्चिती, जागावाटप आणि आघाडीबाबत हालचालींना येत्या काही दिवसांत वेग येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील, विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांचा एकत्रित फोटो म्हणजे केवळ एक भेट नसून, आगामी राजकीय रणनीतीचा संकेत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, या भेटीबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या संभाव्य समन्वयाबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
हेही वाचा : सांगली जिल्ह्यात कोण कुठे सत्तेत? नवनिर्वाचित नगराध्यक्षांची संपूर्ण यादी.
- वाळवा तालुक्यात भीषण अपघात; पुलावर दुचाकी आदळून युवकाचा मृत्यू, मित्र गंभीर जखमी
- इराण-इस्रायल तणावामुळे तेल दर वाढणार? सांगलीत पेट्रोल 104.07 रुपये; सध्या दरवाढ नाही
- विटा-कराड मार्गावर भीषण अपघात; जखमी महिलेचा 10 दिवसांनी मृत्यू
- सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड 13 मार्चला; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी
- सांगलीत कृष्णा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ‘हजारो मासे मृत, 5 लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका’
- कवठेमहांकाळमध्ये 2.88 किलो गांजा जप्त; तस्कर अटकेत









