Sangli Election News | सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी (MVA) एकत्रितपणे रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) हे तिन्ही पक्ष संयुक्तपणे निवडणूक लढवणार असून, लवकरच जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी सोमवारी संयुक्तपणे ही भूमिका मांडली. “सांगली शहराच्या विकासाकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. मूलभूत नागरी प्रश्नांवर मविआ एकत्र येऊन निवडणूक लढवेल,” असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. येत्या दोन-तीन दिवसांत जागावाटपावर शिक्कामोर्तब होईल, असेही त्यांनी सांगितले.
सांगली महापालिकेत काँग्रेस हा पारंपरिकदृष्ट्या मोठा पक्ष राहिला असून, २०१५ च्या निवडणुकीत काँग्रेसला लक्षणीय यश मिळाले होते. त्यानंतर २०१८ मध्ये भाजपला सत्ता मिळाली होती. २०२३ मध्ये महापालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक राजवटीत शहराचा कारभार सुरू आहे.
महायुतीही एकत्र लढणार
दुसरीकडे, भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीही सांगली महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढवण्याच्या तयारीत आहे. पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण झाली असून, निवडण येण्याची क्षमता असलेले उमेदवार मैदानात उतरवण्यावर भर दिला जाणार आहे. युवकांना प्राधान्य देण्याची रणनीतीही महायुतीकडून आखली जात आहे.
थेट लढत मविआ विरुद्ध महायुती?
दोन्ही आघाड्यांनी संयुक्त लढतीचे संकेत दिल्याने सांगली–मिरज–कुपवाड महापालिका निवडणूक थेट मविआ विरुद्ध महायुती अशी चुरशीची होण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य सेवा आणि शहर विकास हे मुद्दे यंदाच्या निवडणुकीत केंद्रस्थानी राहणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
महापालिका निवडणूक : उमेदवार खर्च मर्यादा काय?
महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचार खर्चावर राज्य निवडणूक आयोगाने मर्यादा निश्चित केल्या आहेत. महापालिकेच्या वर्गीकरणानुसार ही खर्च मर्यादा वेगवेगळी आहे. अ वर्ग महानगरपालिकेसाठी एका उमेदवाराला जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत खर्च करता येणार आहे. ब वर्गासाठी ही मर्यादा 13 लाख, क वर्गासाठी 11 लाख तर ड वर्ग महानगरपालिकेसाठी 9 लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
याशिवाय प्रत्येक राजकीय पक्षाला जास्तीत जास्त 40 स्टार प्रचारकांची नोंद करता येणार आहे. या स्टार प्रचारकांवर होणारा खर्च उमेदवाराच्या वैयक्तिक खर्चात धरला जाणार नाही, अशी स्पष्ट माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा: मिरजेतील काँग्रेस-शरद पवार गटातील ‘हे’ दिग्गज नेते अजित पवार गटात प्रवेशासाठी बारामतीत.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









