सांगली : सांगली जिल्ह्यात सायबर फसवणुकीसाठी नागरिकांची बँक खाती भाड्याने घेऊन त्यांचा गैरवापर केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सायबर पोलिसांनी या प्रकरणात एका संशयिताला अटक केली असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात डेबिट कार्ड, मोबाईल सिमकार्ड, मोबाईल फोन आणि वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सायबर पोलिसांच्या तपासानुसार, या प्रकरणात सांगली जिल्ह्यातील तब्बल ३७ नागरिकांची बँक खाती ‘म्युल अकाउंट’ म्हणून वापरण्यात आली. या खात्यांचा उपयोग विविध सायबर फसवणूक प्रकरणांमध्ये करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान संशयिताकडून ३४ डेबिट कार्ड, २७ मोबाईल सिमकार्ड, सहा मोबाईल फोन आणि चारचाकी वाहन असा सुमारे ११ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
म्युल अकाउंट म्हणजे काय?
सायबर गुन्हेगारांकडून काही व्यक्तींना आर्थिक आमिष दाखवून त्यांच्या बँक खात्यांचा वापर केला जातो. या खात्यांमध्ये फसवणुकीतून मिळालेली रक्कम जमा करून पुढे ती इतर खात्यांत वळवली जाते, रोख स्वरूपात काढली जाते किंवा इतर डिजिटल माध्यमांतून वापरली जाते. अशा खात्यांना ‘म्युल अकाउंट’ असे म्हटले जाते.
सांगलीसह इतर भागांतून संशयास्पद व्यवहार
पोलिस तपासात संशयित हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने सांगलीसह इतर ठिकाणच्या बँक खात्यांतून संशयास्पद आर्थिक व्यवहार करत असल्याचे आढळून आले आहे. या खात्यांचा वापर ऑनलाइन सायबर फसवणुकीसाठी होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस तपास सुरू
संशिताने आणखी किती नागरिकांची फसवणूक केली आहे, तसेच या रॅकेटमागे आणखी कोण कोण सहभागी आहेत, याचा सखोल तपास सायबर पोलीस करत आहेत. भविष्यात अशा प्रकारचे सायबर गुन्हे रोखण्यासाठी तपास अधिक व्यापक करण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन
सायबर पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत बँक खाते, एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, ओटीपी किंवा मोबाईल सिम इतरांच्या ताब्यात देऊ नये, असे आवाहन केले आहे. अशा प्रकारे बँक खाते भाड्याने देणे कायदेशीर गुन्हा ठरू शकते, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा: सांगली जिल्ह्यातून रब्बी हंगामात पीक विम्याला अल्प प्रतिसाद; केवळ २५ टक्के शेतकरी सहभागी.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









