सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेची महापौर व उपमहापौर निवडणूक मंगळवार, दि. 10 फेब्रुवारी रोजी होणार असून, यामुळे शहराच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली असून, सत्तास्थापनेसाठी विविध पक्षांकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.
महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया दि. 2 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, दि. 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
महापालिकेच्या 78 सदस्यीय सभागृहात भाजप 39 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसला 18, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 16, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) 3 तर शिवसेनेला 2 जागा मिळाल्या आहेत. भाजपचे बहुमत केवळ एका जागेने हुकले असून, सत्तास्थापनेसाठी युतीच्या शक्यतांवर राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी अशी महायुती होण्याचे संकेत मिळत असून, अंतिम निर्णयासाठी वरिष्ठ नेत्यांकडे विशेषतः मुंबईकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, काँग्रेस व राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) यांच्याही हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
महापौर पदासाठी भाजपमधून निरंजन आवटी, धीरज सूर्यवंशी, रोहिणी पाटील, अतुल माने, ॲड. स्वाती शिंदे आणि अनिता पवार यांची नावे चर्चेत आहेत. काही उमेदवारांच्या पाठीशी वरिष्ठ नेत्यांचे समर्थन असल्याचीही राजकीय चर्चा सुरू आहे.
दरम्यान, स्थायी समितीत बहुमत मिळवण्यासाठी भाजपला इतर पक्षांच्या पाठिंब्याची आवश्यकता असल्याने पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: कुपवाडमध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर 30 हजारांचा दंड; सांगली महापालिकेच्या भरारी पथकाची थेट कारवाई.
- जतचा दुष्काळ लवकरच संपणार? 65 गावांना पाणी, 26,500 हेक्टर सिंचनाचा मार्ग मोकळा
- राज्यात 2000 नवीन ग्रंथालयांना मान्यता; सांगलीतील ग्रंथोत्सवात पालकमंत्र्यांची घोषणा
- आटपाडीत दुकानफोडी; दिघंचीतील इलेक्ट्रिकल दुकान फोडून 70 हजारांचा माल लंपास
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर









