सांगली : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात वाळवा तालुक्यातील ओबीसी समाजाने आरक्षण हक्क मोर्चाचे आयोजन केले आहे. बुधवार, २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता इस्लामपूर येथील वाळवा पंचायत समितीपासून मोर्चाची सुरुवात होणार असून तहसील कार्यालयावर मोर्चाचे समापन करण्यात येईल.
पत्रकार परिषदेत बोलताना निमंत्रक चिमण डांगे यांनी सांगितले की, हा मोर्चा कोणत्याही समाजाविरोधात नसून, शासनाने काढलेल्या अध्यादेशाच्या विरोधात आहे. या अध्यादेशामुळे ओबीसींच्या विद्यमान २७ टक्के आरक्षणावर गदा येण्याची शक्यता असल्याने अस्वस्थता निर्माण झाली आहे.
बैठकीत एकमत
तालुक्यातील ५४ जातींचा समावेश असलेल्या ओबीसी समाजातील प्रतिनिधींच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास ते थेट ओबीसी प्रवर्गात सामील होतील आणि यामुळे शिक्षण, नोकरी व राजकीय संधींमध्ये विद्यमान ओबीसी समाजावर अन्याय होईल, अशी भूमिका मांडण्यात आली.
विशेष वैशिष्ट्य
या मोर्चाचे नेतृत्व पाच मुली पारंपरिक वेशभूषेत करणार असून, त्या मुलीच तहसीलदारांना निवेदन सादर करतील. मोर्चादरम्यान कोणत्याही प्रकारच्या टीका-टिप्पणी किंवा घोषणाबाजी न करता शिस्तबद्ध पद्धतीने मागण्या मांडल्या जातील, असे आयोजकांनी स्पष्ट केले.
पार्श्वभूमी
राज्य शासनाने हैदराबाद, सातारा आणि औंध संस्थानच्या गॅझेटियरमधील नोंदींचा आधार घेत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. याच निर्णयाला ओबीसी समाजाचा विरोध असून, सरसकट प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाची मुळ रचना धोक्यात येईल, असा इशारा आयोजकांनी दिला आहे.
हेही वाचा: या योजनेमुळे सांगलीतील अनेक तरुणांनी उभे केले स्वतःचे उद्योग-व्यवसाय; सात वर्षांत ९१८ कोटींचे कर्जवाटप.