Leopard in Sangli | सांगली : शिराळा तालुक्यातील शिवरवाडी येथे नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरात घुसलेल्या बिबट्याला अखेर दीड तासाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर वनविभाग आणि सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सच्या पथकाने सुरक्षितपणे पकडले. या संपूर्ण मोहिमेचे दृश्य पाहण्यासाठी गावासह पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी झुंबड उसळली होती.
अशोक बेंदरे यांच्या घराचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून, काही दिवसांपूर्वीच या घरात एकदा बिबट्याचा वावर दिसल्याने त्याला हुसकावण्यात आले होते. मात्र, शनिवारी सकाळी पुन्हा नाथा बेंदरे पाण्याची पाइप आणण्यासाठी घरात गेले असता, त्यांना बिबट्या शांतपणे आत बसलेला दिसला. त्यांनी तत्काळ बाहेर येऊन कुटुंबीयांसह घराचे प्रवेशद्वार पत्र्यांनी बंद केले आणि वन विभागाला माहिती दिली.
दीड तासाचा श्वास रोखून धरणारा थरार
वन विभागाचे पथक लोखंडी पिंजरा, जाळी आणि आवश्यक उपकरणांसह घटनास्थळी दाखल झाले. घराच्या एका चौकटीजवळ पिंजरा लावण्यात आला. सुरुवातीला फटाके फोडून बिबट्याला बाहेर आणण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याचा फायदा झाला नाही. त्यानंतर बांबू आणि काठ्यांच्या मदतीने हळूहळू बिबट्याला पिंजऱ्याकडे ढकलण्यात आले. सुमारे दीड तास चाललेल्या या मोहिमेनंतर बिबट्या सुरक्षितरित्या जेरबंद झाला.
गावकऱ्यांचा मोठा जमाव
घटनास्थळी बिबट्याच्या पकड मोहिमेचे थेट दर्शन घेण्यासाठी जवळपासच्या सर्व गावांतून नागरिक धावत आले. सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील तसेच अनेक लोकप्रतिनिधीही या मोहिमेत उपस्थित होते.
सापडलेल्या बिबट्याला चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.
हेही वाचा: 15 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सांगलीत अहिल्यादेवींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण.



