सांगली : सांगली जिल्ह्यात ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांसाठी हृदयविकार, कॅन्सर, मूत्रपिंड रोपण किंवा मेंदू-मणक्याच्या शस्त्रक्रियेचा खर्च मोठी आर्थिक अडचण ठरत आहे. अशा परिस्थितीत सांगली जिल्हा परिषदेकडून गरजू रुग्णांसाठी ‘मा. लोकनेते राजारामबापू पाटील आर्थिक मदत योजना’ राबवली जात आहे.
सांगली जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीतून सुरु असलेल्या या योजनेअंतर्गत, ग्रामीण भागातील गरीब व गरजू रुग्णांना दुर्धर आजारांच्या उपचारासाठी 15 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. हृदयशस्त्रक्रिया, कॅन्सर उपचार, मूत्रपिंड रोपण, मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियांचा यामध्ये समावेश आहे.
ही मदत घेण्यासाठी उपचार शासनमान्य रुग्णालयात करणे आवश्यक असून, खर्चाचे कोटेशन किंवा डिस्चार्ज प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तसेच लाभार्थी सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असणे आवश्यक आहे. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सांगलीमार्फत ही योजना राबवली जाते.
या योजनेसाठी अर्ज करताना रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, रुग्णालयाचे कागदपत्र आणि बँक पासबुक इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते. अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम अपुरी वाटू शकते; मात्र उपचारासाठी आर्थिक अडचणीत सापडलेल्या ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांसाठी ही मदत महत्त्वाचा आधार ठरू शकते, असे मत आरोग्य क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.
हेही वाचा: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सोनेतारण कर्जाची मर्यादा वाढवली; १ फेब्रुवारीपासून नवे दर लागू.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









