सांगली : शिराळा खुर्द (ता. शिराळा) येथे गावातील वादाने हिंसक वळण घेत सरपंच शर्मिला दत्ताजीराव आंदळकर यांच्या पतीवर डेअरीत घुसून हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजता आंदळकर दूध डेअरीसमोर वाद सुरू झाला. सुर्यकांत केसरकर यांनी शिवीगाळ केल्यानंतर त्यांचा मुलगा ओम केसरकर हा हातात लोखंडी गज घेऊन तेथे आला. दत्ताजीराव आंदळकर हे डेअरीत गेल्यानंतर दरवाजा ढकलून ओम केसरकर आत शिरला आणि त्यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूस लोखंडी गजाने जोरात वार केला. या मारहाणीमुळे त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला.
भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सरिता आंदळकर यांनाही खाली पाडून पोटावर व पायावर मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
गोंधळाच्या दरम्यान सरिता आंदळकर यांच्या गळ्यातील सुमारे 2 लाख 50 हजार रुपये किमतीचा पाच तोळे वजनाचा सोन्याचा राणीहार तसेच डेअरीच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली सुमारे 90 हजार रुपये रोख रक्कम गायब झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
याशिवाय प्रशांत पाटील हा कु-हाड घेऊन आल्याचा तसेच विश्वास पाटील यांनी काठीने मारहाण केल्याचा उल्लेख आहे. इतर काही जणांनीही शिवीगाळ व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याची माहिती पोलिसांत देण्यात आली आहे.
या प्रकरणी सुर्यकांत केसरकर, ओम केसरकर आणि इतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा: सांगली–मिरजमध्ये माजी सैनिकांसाठी सुरक्षा रक्षक भरती; 12 मार्च शेवटची तारीख.
- शिराळ्यात सरपंचांच्या पतीवर डेअरीत घुसून हल्ला; लोखंडी गजाने डोक्यात वार, राणीहार व 90 हजार रोख रक्कम गायब
- सांगली–मिरजमध्ये माजी सैनिकांसाठी सुरक्षा रक्षक भरती; 12 मार्च शेवटची तारीख
- सांगलीसह 7 जिल्ह्यांतील तरुणांसाठी अग्निवीर भरतीची संधी; ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख 1 एप्रिल 2026
- सांगली–मिरज रोडवर दुचाकीची पाठीमागून धडक; कोल्हापूरच्या 62 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
- ट्रॉलीला ओव्हरटेक करताना मागून एसटीची धडक; विट्यात 66 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
- भाजी महाग, चिकन स्वस्त? सांगलीत गवारीच्या दराने ग्राहक हैराण









