विटा : विटा शहरात बांधकाम अपूर्ण असताना बनावट पालिका कागदपत्रांच्या आधारे तळमजल्यावरील दोन गाळ्यांची विक्री करून 21 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विटा पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमा व्यावसायिक आशिष रवींद्र दिवटे यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, संबंधित आरोपींनी विटा येथील सिटी सर्व्हे नंबर 1603 मधील जागेवर व्यापारी गाळे व अपार्टमेंट बांधण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी बांधकाम परवाना, प्रारंभ प्रमाणपत्र तसेच बांधकाम पूर्णत्वाचा पालिकेचा दाखला असल्याचे भासवून बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली.
बनावट कागदपत्रांच्या आधारे विकास करारानुसार तळमजल्यावरील दक्षिण बाजूचे दोन गाळे 21 लाख 80 हजार रुपयांना विकल्याचा आरोप आहे. यासंदर्भातील खरेदीपत्र 28 जून 2023 रोजी विटा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविण्यात आले होते.
नंतर संबंधित कागदपत्रांची खातरजमा केली असता, विटा पालिकेकडून अशी कोणतीही अधिकृत परवानगी किंवा दाखले देण्यात आलेले नसल्याचे समोर आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत संबंधित दोघांविरुद्ध विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: सांगली महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरु; 31 डिसेंबरला छाननी.
- इराण-इस्रायल तणावामुळे तेल दर वाढणार? सांगलीत पेट्रोल 104.07 रुपये; सध्या दरवाढ नाही
- विटा-कराड मार्गावर भीषण अपघात; जखमी महिलेचा 10 दिवसांनी मृत्यू
- सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड 13 मार्चला; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी
- सांगलीत कृष्णा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ‘हजारो मासे मृत, 5 लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका’
- कवठेमहांकाळमध्ये 2.88 किलो गांजा जप्त; तस्कर अटकेत
- सांगलीत ‘आमदार केसरी 2026’ भव्य बैलगाडी शर्यत; विजेत्यास 1 लाखांचे बक्षीस









