मुंबई | महाराष्ट्र न्यूज : राज्य सरकारने मोठा निर्णय घेत सर्व दुकाने, व्यावसायिक आस्थापना आणि चित्रपटगृहांना (theatres) २४ तास सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, यामध्ये मद्यविक्री करणारी हॉटेल्स, बार आणि वाईन शॉप्स यांना सूट देण्यात आलेली नाही.
उद्योग, ऊर्जा, कामगार व खाण विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले असून, २०१७ च्या महाराष्ट्र दुकान व आस्थापना अधिनियम (Maharashtra Shops and Establishments Act, 2017) अंतर्गत ही मुभा दिली आहे. या कायद्याप्रमाणे, कोणत्याही आस्थापनाने कर्मचाऱ्यांना सलग २४ तासांची आठवडा सुट्टी द्याविच लागेल.
स्थानिक प्रशासन व पोलिस विभागांना कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनेक व्यापाऱ्यांना पोलिसांकडून होणाऱ्या त्रासाविषयी तक्रारी येत होत्या. या निर्णयामुळे रात्रभर दुकाने सुरु ठेवता येतील आणि त्यामुळे अर्थव्यवस्था व व्यवसायांना चालना मिळेल, असे सरकारचे म्हणणे आहे.
चित्रपटगृहांच्या वेळांवरील मर्यादा देखील हटवण्यात आल्या आहेत. त्यामुळे थिएटर्सना आता हवे तसे शो घेण्याची मुभा मिळाली आहे.
या निर्णयामुळे विशेषतः आगामी सणासुदीच्या काळात दुकानदार व व्यावसायिकांना मोठा फायदा होणार असल्याचा अंदाज आहे.