Sangli News | सांगली : नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील शिक्षकांना आता अंगणवाडीतही शैक्षणिक जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबत स्पष्ट आदेश जारी केले असून, प्रत्येक प्राथमिक शिक्षकाने आठवड्यातून किमान एक दिवस अंगणवाडीतील बालकांसाठी अध्यापन व मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.
या निर्णयानुसार संबंधित शिक्षक आपल्या शाळेपासून एक किलोमीटरच्या परिघातील अंगणवाडीला भेट देऊन पूर्व-प्राथमिक वयोगटातील मुलांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन करणार आहेत. विशेषतः इयत्ता पहिलीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांवर ही जबाबदारी अधिक असेल, असे विभागीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
नव्या धोरणाचा उद्देश काय?
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार अंगणवाडी (पूर्व-प्राथमिक) आणि इयत्ता पहिली यांना एकाच शैक्षणिक स्तरात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अंगणवाडीतील मुलांना लवकरच प्राथमिक शिक्षणाची ओळख व्हावी, त्यांची भाषा, संख्या ओळख आणि संकल्पनात्मक तयारी व्हावी, हा या निर्णयामागील प्रमुख हेतू आहे.
अंगणवाडीत काय बदल होणार?
पुणे येथील विद्या प्राधिकरणाच्या सहकार्याने अंगणवाडीतील मुलांसाठी स्वतंत्र ‘आकार अभ्यासक्रम’ विकसित करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्राथमिक शिक्षकांचे शैक्षणिक मार्गदर्शन मिळणार आहे. अध्यापन पद्धती, खेळाधारित शिक्षण आणि मूलभूत संकल्पनांवर भर दिला जाणार आहे.
शाळा-अंगणवाडी समन्वय वाढणार
शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद शाळांमधील १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, स्नेहसंमेलने व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अंगणवाडीतील मुलांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. वार्षिक परीक्षेनंतर आकार अभ्यासक्रम पूर्ण झाल्याचे शिक्षक व अंगणवाडी सेविकांच्या संयुक्त स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मुलांना देण्यात येईल. यानंतर त्यांना इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यात येणार आहे.
सांगली जिल्ह्यावर परिणाम
या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील शिक्षण अधिक शिस्तबद्ध व दर्जेदार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच प्राथमिक शाळांतील पटसंख्या वाढविण्यासाठीही हा निर्णय उपयुक्त ठरणार असल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
हेही वाचा: उमदी येथील तरुणाचा निर्घृण खून; जतमध्ये विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










