सांगली : अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी जाहीर करण्यात आलेल्या वयोमर्यादेमुळे अनेक स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी अपात्र ठरत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. या संदर्भात जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
२९ जुलै २०२५ रोजी संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, त्यामध्ये वयोमर्यादा गणनेची तारीख १ नोव्हेंबर २०२५ अशी नमूद करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गासाठी ३१ वर्षे तर राखीव प्रवर्गासाठी ३४ वर्षे ही वयोमर्यादा लागू आहे. मात्र जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्यामुळे अनेक उमेदवार वयोमर्यादेमुळे परीक्षेस अपात्र ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आमदार पडळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची जाहिरात सुमारे सात महिने उशिरा प्रसिद्ध झाली आहे. यापूर्वी संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ साठी जाहिरात उशिरा आल्याने शासन निर्णयानुसार एक वर्षाची वयोसवलत देण्यात आली होती. तसेच २०२५ मध्ये होणाऱ्या पोलीस शिपाई भरतीसाठीही वयोसवलत लागू करण्यात आली होती, असा दाखला निवेदनात देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर, PSI पदासाठी एक वर्षाची वयोसवलत देण्यात यावी किंवा किमान वयोमर्यादा गणनेची तारीख १ जानेवारी २०२५ गृहीत धरावी, अशी मागणी करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनही सातत्याने ही मागणी होत आहे.
राज्य शासनाकडून या निवेदनावर कोणती भूमिका घेतली जाते, याबाबत पुढील अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










