सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शस्त्रांची तस्करी रोखण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठे यश मिळवले आहे. मध्यप्रदेशातून पिस्तूल आणून तस्करी करणाऱ्या टोळीतील तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सहा पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
या कारवाईत किरण शंकर लोखंडे (वय २४, रा. वाघमोडेनगर, सांगली), अभिजित अरुण राणे (वय ३२, रा. शारदानगर, सांगली) आणि तुषार नागेश माने (वय ३०, रा. हाडको कॉलनी, सांगली) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील पाजी (रा. उमराटी, ता. बलवाडी, मध्यप्रदेश) हा संशयित अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बेकायदेशीर शस्त्रांवर नजर ठेवण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक गुप्त माहितीच्या आधारे तपास करत होते.
दरम्यान, दि. ३ जानेवारी रोजी दुपारी अकुजनगर ते वारणाली रस्त्याच्या परिसरात संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला असता, संशयितांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले.
अंगझडतीदरम्यान त्यांच्या जवळून ४ लाख २१ हजार ५०० रुपये किमतीची सहा पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आली. चौकशीत ही शस्त्रे मध्यप्रदेशातून तस्करीसाठी आणल्याची कबुली संशयितांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
संजयनगर पोलीस ठाणे या प्रकरणाचा पुढील तपास करीत असून, निवडणूक काळात शस्त्रसाठा व तस्करी रोखण्यासाठी पोलिसांकडून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. या कारवाईमुळे सांगली जिल्ह्यातील शस्त्र तस्करीचे मध्यप्रदेश कनेक्शन पुन्हा एकदा समोर आले आहे.
हेही वाचा: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह; गरज नसलेल्यांनाही लाभ सुरूच.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










