सांगली : प्रसूतीदरम्यान किंवा प्रसूतीनंतर आईचा मृत्यू झाल्यास मागे राहिलेल्या मुलांच्या संगोपनासाठी आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने मातामृत्यू लाभ योजना राबवली जात आहे. सांगली जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागामार्फत ही योजना ग्रामीण भागासाठी लागू असून, पात्र कुटुंबांना ₹15,000 पर्यंतचे अनुदान राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राच्या स्वरूपात दिले जाते.
ग्रामीण भागात प्रसूतीशी संबंधित गुंतागुंतीमुळे होणाऱ्या मातामृत्यूंच्या घटनांनंतर अनेक कुटुंबांवर आर्थिक व सामाजिक संकट कोसळते. अशा वेळी मुलांच्या भविष्यासाठी किमान आर्थिक आधार मिळावा, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
किती रक्कम मिळते?
जर प्रसूतीशी निगडीत कारणाने मातेचा मृत्यू पहिल्या जिवंत अपत्यापर्यंत झाला असेल, तर ₹15,000 इतकी रक्कम दिली जाते.
दोन जिवंत अपत्यांनंतर मातेचा मृत्यू झाल्यास, दोन्ही मुलांच्या नावे प्रत्येकी ₹7,500 प्रमाणे एकूण ₹15,000 चे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र दिले जाते. नवजात बाळाचे नाव ठेवलेले नसल्यास, प्रमाणपत्रावर पालक म्हणून वडिलांचे नाव नमूद केले जाते.
कोण पात्र ठरते?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मृत माता सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवाशी असणे आवश्यक आहे. मातेचा मृत्यू हा प्रसूतीपूर्व, प्रसूतीदरम्यान किंवा प्रसूतीनंतर 42 दिवसांच्या आत गरोदरपणाशी संबंधित कारणाने झालेला असावा. तसेच सदर मातेची प्रसूती किंवा गर्भपात शासनमान्य रुग्णालयात झालेला असणे आवश्यक आहे.
मृत मातेची RCH पोर्टलवरील आणि R-15 नोंदणी असणे बंधनकारक आहे. एक किंवा दोनच जिवंत अपत्ये असलेल्या प्रकरणांमध्येच हा लाभ दिला जातो; अपत्य नसल्यास किंवा दोनपेक्षा जास्त अपत्य असल्यास लाभ मिळत नाही.
अर्ज कसा करायचा?
या योजनेसाठीचा प्रस्ताव संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तयार करून जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सांगली यांच्याकडे सादर करावा लागतो. अर्जासोबत मृत्यू प्रमाणपत्र, अपत्यांचे जन्म दाखले, रहिवासी दाखला, रेशनकार्ड, ओळखपत्र तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असते.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी व पडताळणी झाल्यानंतरच लाभ मंजूर केला जातो.
ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना या योजनेची माहिती नसल्यामुळे पात्र असूनही लाभ मिळत नाही, अशी स्थिती दिसून येते. त्यामुळे मातामृत्यू झालेल्या कुटुंबांनी तातडीने आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा: दुर्धर आजारांसाठी सांगली जिल्हा परिषदेची ‘राजारामबापू पाटील आर्थिक मदत योजना’; ग्रामीण रुग्णांना आर्थिक मदत.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










