सांगली : सांगली शहरात आज (१९ सप्टेंबर) पासून तीन दिवसांचा फळ महोत्सव २०२५ (Sangli Fruit Festival 2025) सुरू होणार आहे. राज्य कृषी पणन मंडळ, कोल्हापूर व कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन आज सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मृती भवन, मार्केट यार्ड येथे होणार आहे.
या महोत्सवात ड्रॅगनफ्रूट, डाळिंब, पेरू, सिताफळ यांसह विविध फळ पिके ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करता येणार आहेत. शेतकऱ्यांना मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले असून, थेट विक्रीतून त्यांना योग्य दर मिळावा आणि ग्राहकांना ताज्या फळांचा लाभ मिळावा, हा उद्देश आहे.
महोत्सवाच्या दरम्यान नागरिकांना फळांचे आरोग्यदायी फायदे, पोषणमूल्ये आणि प्रक्रिया उद्योगांबाबत मार्गदर्शनही केले जाणार आहे. ड्रॅगनफ्रूटसारख्या फळांचे आरोग्यविषयक फायदे, रक्तदाब नियंत्रण, रक्तशुद्धी, डोळ्यांचे आणि सांध्यांचे आरोग्य सुधारणा, याबाबत तज्ज्ञ माहिती देतील.
या उपक्रमामुळे सांगलीकरांना थेट शेतकऱ्यांकडून फळे खरेदी करण्याची संधी मिळणार असून, शेतकऱ्यांनाही थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता येणार आहे. २१ सप्टेंबरपर्यंत हा फळ महोत्सव सुरू राहणार आहे.
हेही वाचा : शेअर मार्केटमधून जादा परताव्याचे आमिष; महिलेला १४ लाखांचा गंडा, चौघांविरुद्ध गुन्हा.