सांगली टुडे बाजारपेठ विशेष वृत्त: दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सांगली, मिरज आणि परिसरातील बाजारपेठांमध्ये फराळ खरेदीसाठी ग्राहकांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. नोकरदार वर्ग आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे घरगुती चवीच्या तयार फराळाला (Ready-made Faral) यंदा प्रचंड मागणी आहे. मात्र, दुसरीकडे खाद्यतेल, डाळी, साखर, सुकामेवा आणि विशेषतः सुक्या खोबऱ्याच्या भावात झालेल्या प्रचंड वाढीमुळे यंदा दिवाळी फराळावर महागाईचा मोठा प्रभाव दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तयार फराळाच्या किमतींमध्ये २० ते ३० टक्क्यांची वाढ झाली असून सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
या पार्श्वभूमीवर सांगलीच्या स्थानिक बाजारपेठेतील २०२६ च्या दिवाळी फराळाचे अधिकृत दर समोर आले असून लाडू, करंजी, चकली आणि चिवड्याचे किलोचे नेमके भाव काय आहेत, याचा हा सविस्तर आढावा.
फराळाचे साहित्य महागले; खोबरे ₹४०० च्या पार!
यंदा अनेक भागांत झालेल्या अत्यल्प पावसामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. याचा थेट परिणाम कृषी मालाच्या आवकेवर आणि पर्यायाने दिवाळी फराळाच्या साहित्यावर झाला आहे.
- करंजी आणि चिवड्यासाठी लागणारे सुके खोबरे थेट ४०० रुपये प्रति किलोच्या पुढे गेले आहे.
- खाद्यतेल, बेसन, हरभरा डाळ, पोहे आणि साखरेच्या दरात वाढ झाल्याने तळणीच्या पदार्थांचा खर्च वाढला आहे.
- चांगल्या प्रतीची ज्वारी आणि डाळी महागल्याने घरगुती पातळीवर फराळ बनवणेही खर्चिक झाले असून, तयार फराळाच्या दरातही सरासरी २० ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे.
चकली, शेव आणि नमकीन पदार्थांचे दर काय?
दिवाळीसाठी अस्सल भाजणीच्या चकलीला ग्राहकांकडून सर्वाधिक मागणी आहे. सांगली बाजारातील सध्याच्या दरपत्रकानुसार:
- घरगुती भाजणी चकली (हॅन्डमेड): ₹६०० ते ₹६५० प्रति किलो
- भाजणी चकली (मशीन मेड): ₹४०० ते ४५० प्रति किलो
- भाजणी कडबोळी: ₹४०० प्रति किलो
- कोल्हापूरी पुडाची वडी: ₹४०० ते ₹४५० प्रति किलो
- बाकरवडी व मिनी बाकरवडी: ₹३५० प्रति किलो
- खारी शंकरपाळी: ₹४५० प्रति किलो
चिवड्याचे प्रकार (प्रति किलो दर):
- स्पेशल ड्रायफ्रूट पोहे चिवडा: ₹७५०
- ड्राय पोहे चिवडा: ₹४००
- गुलमोगर पोहे चिवडा: ₹६५०
- भाजके पोहे, पातळ पोहे, मक्का पोहे व तळीव पोहे चिवडा: प्रत्येकी ₹३५० किलो
- शेवचे प्रकार (बारीक ० नं., पिवळी, तिखट, पापडी): ₹३५० किलो; तर लसूण शेव ₹४५० किलो.
गोड पदार्थांचे भाव: साजूक तुपातील लाडू आणि करंजीचे दर
कच्च्या मालाचे भाव कडाडले असले, तरी पारंपरिक चव जपणाऱ्या दर्जेदार साजूक तुपातील लाडवांना चांगली पसंती मिळत आहे.
- मोतीचूर लाडू: तेलातील ₹४०० किलो, तर साजूक तुपातील ₹१००० किलो.
- ड्रायफ्रूट बेसन लाडू: तेलातील ₹४०० किलो, तर तुपातील ₹८५० किलो.
- ड्रायफ्रूट रवा लाडू: तेलातील ₹३५० किलो, तर तुपातील ₹७०० किलो.
- ड्रायफ्रूट मूग लाडू (तुपातील): ₹८५० किलो.
- करंजी: ओल्या नारळाची ₹९५० किलो, तर सुक्या नारळाची ₹६५० किलो.
- अनारसे: तेलातील ₹७५० किलो, तर तुपातील ₹१४०० किलो.
- चिरोटे: तेलातील ₹७५० किलो, तुपातील ₹१२०० किलो.
- काजू कतली बर्फी: ₹१४०० किलो.
- सोनपापडी, म्हैसूरपाक, खाजा, बालूशाही: प्रत्येकी ₹३५० ते ₹४०० किलो.
कॉर्पोरेट गिफ्टिंग आणि पार्सल सेवेला पसंती
सांगली, मिरज तसेच विश्रामबाग परिसरातील प्रमुख फराळ विक्रेते व स्थानिक उत्पादकांकडून कॉर्पोरेट गिफ्टिंग बॉक्सेस, कस्टमाईज किट्स तसेच ऑनलाईन माध्यमातून ऑर्डर बुकिंग सुरू करण्यात आली आहे. याशिवाय परगावी आणि परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांसाठी विशेष कुरिअर पॅकिंगची सोय उपलब्ध असल्याने दिवाळीच्या शेवटच्या २-३ दिवसांतील गर्दी टाळण्यासाठी नागरिक आत्तापासूनच फराळ ऑडर करताना दिसत आहेत.



