सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्या वतीने मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा प्रवर्गातील पदवीधर युवक-युवतींसाठी एक वर्षाचे विनामूल्य उद्योजकता विकास प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना स्टार्टअप उभारणीसाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासह दरमहा २५ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर २०२६ आहे, अशी माहिती सारथी उपकेंद्र, कोल्हापूरचे सह व्यवस्थापकीय संचालक तथा अपर जिल्हाधिकारी अजय पवार यांनी दिली.
सन २०२६-२७ या वर्षासाठी सारथी उपकेंद्र कोल्हापूर विभागामार्फत सांगली आणि कोल्हापूर येथील नामवंत इनक्युबेशन केंद्रांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. नवउद्योजकांच्या नाविन्यपूर्ण व्यावसायिक कल्पनांना प्रत्यक्ष उद्योगाचे स्वरूप देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
हे ही वाचा: लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ होणार? ई-केवायसी मुदतवाढ व थकीत हप्त्याबाबत सरकारचा मोठा निर्णय.
प्रशिक्षणाची प्रमुख वैशिष्ट्ये:
- कालावधी व स्वरूप: १ वर्ष (पूर्णतः मोफत प्रशिक्षण).
- विद्यावेतन: एका वर्षाच्या कालावधीसाठी दरमहा रु. २५,०००/- आर्थिक सहाय्य.
- इनक्युबेशन केंद्रे:
१) नेत्रा-आरआयटी फाउंडेशन, सांगली (NETRA-RIT Foundation, Sangli)
२) एसयूके रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (SUK R&D Foundation)
- जागा मर्यादा: प्रत्येक इनक्युबेशन केंद्रात केवळ १० विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
- इतर सुविधा: स्टार्टअप उभारणीसाठी आवश्यक भौतिक संसाधने, तांत्रिक सहाय्य, प्रयोगशाळा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन.
उमेदवारांसाठी पात्रता निकष:
- उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- उमेदवार मराठा, कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा प्रवर्गातील आणि किमान पदवीधर असावा.
- कुटुंबाचे सर्व स्रोतांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे (उत्पन्न प्रमाणपत्र किंवा नॉन-क्रिमीलेअर आवश्यक).
- उमेदवाराने यापूर्वी सारथी संस्थेकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
- उमेदवाराकडे स्वतःची नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाधारित व्यवसाय कल्पना असावी, जिचे एका वर्षात स्केलेबल स्टार्टअपमध्ये रूपांतर करण्याची क्षमता असावी.
- प्रशिक्षण काळात उमेदवाराने पूर्णवेळ कार्यरत राहणे आणि औपचारिक बिझनेस प्लॅन सादर करणे आवश्यक आहे.
हेही वाचा: दुष्काळी तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५,००० अग्रिम मदत जमा होण्यास सुरु; ‘हे’ शेतकरी ठरले पात्र.
आवश्यक कागदपत्रे:
जन्माचा दाखला, जात प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र (Domicile), वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र / नॉन क्रिमीलेअर, ओळखपत्र (आधार कार्ड), पदवी प्रमाणपत्र, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो.
ऑनलाईन अर्ज कसा करावा?
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून २१ नोव्हेंबर २०२६ ही शेवटची तारीख आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून मुदतीत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
📢 सांगली जिल्ह्यातील ताज्या बातम्या, महाराष्ट्रातील शासकीय योजना, नवीन शासन निर्णय (GR), आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा.👇



