सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): सांगली जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने उपाययोजना गतिमान केल्या आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत ५० खाजगी आणि ७ शासकीय अशा एकूण ५७ टँकर्सद्वारे ५८ गावे आणि ४१५ वाड्यांमधील सुमारे १ लाख २१ हजार ६३६ बाधित नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने आतापर्यंत ३१ खाजगी विहिरी व बोअरवेलचे अधिग्रहण केले आहे.
जिल्हा परिषदेच्या ताज्या अहवालानुसार, बाधित भागातील नागरिकांसोबतच ११ हजार ३४६ पशुधनासाठीही टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.
जत तालुक्याला सर्वाधिक झळ
जिल्ह्यात जत तालुक्याला तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. जत तालुक्यातील ४९ गावे आणि ३४६ वाड्यांमधील सुमारे १ लाख ४ हजार २५६ लोकसंख्येसाठी एकट्या जत तालुक्यात ४८ टँकर्स (४२ खाजगी व ६ शासकीय) धावत आहेत. याशिवाय जतमध्ये टंचाईवर मात करण्यासाठी २० खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून २ डिझेल इंजिन भाड्याने घेण्यात आले आहेत.
तालुकानिहाय परिस्थिती पुढीलप्रमाणे:
- आटपाडी: ७ गावे आणि ५५ वाड्यांमधील १४ हजार ६९१ नागरिकांसह ११ हजार ३४६ पशुधनासाठी ७ खाजगी टँकर सुरू असून ३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
- कवठेमहांकाळ: १ गाव आणि ८ वाड्यांमधील १८३४ लोकसंख्येसाठी १ शासकीय टँकर सुरू आहे. नळ पाणीपुरवठा विहिरीतील पाणी घटल्याने २ खाजगी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.
- तासगाव: १ गाव आणि ६ वाड्यांमधील ८५५ नागरिकांसाठी १ खाजगी टँकर सुरू असून ३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
- खानापूर: २ गावे टंचाईग्रस्त असून उपाययोजना म्हणून ३ खाजगी विहिरी/बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन मागणीनुसार आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ टँकर मंजूर करणे आणि विहीर अधिग्रहणाची प्रक्रिया वेगाने राबवण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे सांगण्यात आले आहे.



