सांगली: सांगली येथील कौटुंबिक न्यायालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर सोमवारी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल आल्याने संपूर्ण न्यायालय आणि शहर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. प्राथमिक माहितीनुसार, केवळ सांगलीच नव्हे, तर महाराष्ट्रातील अनेक जिल्हा न्यायालयांना अशाच प्रकारचे धमकीचे ई-मेल आल्याचे समोर आले आहे. सांगलीत या धमकीच्या संदेशानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आदिती कदम यांनी तात्काळ खबरदारी घेत न्यायालय परिसर पूर्णपणे रिकामा करून पोलीस यंत्रणेला पाचारण केले.
पंजाबी भाषेत आला होता धमकीचा ई-मेल; ‘मेट्रो’चाही उल्लेख
मिळालेल्या माहितीनुसार, हा धमकीचा ई-मेल पंजाबी भाषेत पाठवण्यात आला होता. या ई-मेलमध्ये जिल्हा न्यायालयाचा उल्लेख करताना दुपारी २ वाजून ११ मिनिटे आणि ३ वाजून ११ मिनिटांची वेळ नमूद करण्यात आली होती. यामध्ये जिल्हा न्यायालयासोबत ‘मेट्रो स्टेशन’ असाही उल्लेख करत आयईडी (IED) बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती.
उच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर कोर्ट केले रिकामे
धमकीचा ई-मेल समोर येताच प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आदिती कदम यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रबंधकांशी तात्काळ संपर्क साधला. उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार, न्यायालयात उपस्थित असलेले सर्व सन्माननीय न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि कामानिमित्त आलेल्या सर्व पक्षकारांना सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्वरित इमारतीबाहेर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर काही वेळातच संपूर्ण न्यायालय परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला.
न्यायालय इमारतीची कसून तपासणी
धमकीच्या संदेशानंतर तात्काळ पोलीस दलाला पाचारण करण्यात आले. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (BDDS) न्यायालय इमारतीचा ताबा घेऊन प्रत्येक दालन, परिसर आणि वाहनांची तपासणी केली. सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण इमारतीची तपासणी पूर्ण करण्यात आली असून, पुढील रूपरेषा स्पष्ट केली जाणार आहे.
महाराष्ट्रातील अनेक न्यायालयांना धमक्यांचे सत्र
प्राथमिक माहितीनुसार, सांगलीप्रमाणेच राज्यातील इतरही काही जिल्हा न्यायालयांना अशाच आशयाचे धमकीचे संदेश प्राप्त झाल्याचे समजते. एकाच दिवशी अनेक न्यायालयांना लक्ष्य करून अशा धमक्या आल्याने राज्यभरातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून या ई-मेलचा मूळ स्त्रोत शोधण्यासाठी सायबर विभागाकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
हेही वाचा: पुण्यात मुसळधार, पुढील २४ तास ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट; IMD चा इशारा.



