मुंबई (सांगली टुडे वृत्तसेवा): राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील एकवेळ समझोता (OTS) योजनेसाठी पात्र ठरलेल्या १ लाख ६९ हजार ८२० शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली असून, ही यादी गावातील ग्रामपंचायत, विकास संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
काय आहे ओटीएस योजना आणि लाभ कसा मिळणार?
या कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या २०.७२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर १८ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यातील एकवेळ समझोता (ओटीएस) योजना ही ज्या शेतकऱ्यांचे थकीत कर्ज दोन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी लागू करण्यात आली आहे.
या नियमानुसार, शेतकऱ्यांनी आपल्या कर्जातील दोन लाख रुपयांवरील हिश्श्याची रक्कम संबंधित बँकेत जमा करायची आहे. शेतकऱ्याने आपल्या हिश्श्याचे पैसे बँकेत भरल्यानंतर शासनाकडून उर्वरित दोन लाख रुपयांपर्यंतचा कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना आपल्या हिश्श्याची रक्कम भरण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
यादीतील तपशील आणि महत्त्वाच्या अटी
बँक आणि ग्रामपंचायतींमध्ये लावलेल्या या यादीत शेतकऱ्याचे नाव, गाव, कर्जखाते क्रमांक, ३१ मार्च २०२६ अखेरची थकबाकी, शेतकऱ्याने भरायची रक्कम आणि सरकारकडून मिळणाऱ्या लाभाची रक्कम हा सर्व तपशील दिलेला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक (AgriStack) नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच मृत, वयोवृद्ध किंवा बोटांचे ठसे नोंदवण्यात अडचण येणाऱ्या शेतकऱ्यांना १९ ऑगस्ट २०२६ च्या कार्यप्रणालीनुसार लाभ दिला जाणार आहे.
पुणे विभागात ४० हजारांहून अधिक शेतकरी पात्र
प्रसिद्ध झालेल्या या पहिल्या यादीत नाशिक विभागात सर्वाधिक ४८ हजार ३७९ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्याखालोखाल पुणे विभागात (सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे) ४० हजार ९४६ शेतकरी, छत्रपती संभाजीनगर विभागात ३९ हजार ५९७, अमरावती विभागात २५ हजार ९१७, नागपूर विभागात १२ हजार ००२ आणि कोकण विभागात २ हजार ९७९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. बँकांकडून प्राप्त होणाऱ्या माहितीची छाननी अजूनही सुरू असून, उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही पुढील काळात टप्प्याटप्प्याने जाहीर केल्या जातील, असे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे.
📢 शेतकरी कर्जमुक्ती योजना, पीक विमा, अनुदान आणि कृषी विभागाचे शासन निर्णय सर्वात आधी वाचण्यासाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा. 👇



