MPSC Exam Postpone Demand | सांगली : मराठवाडा व विदर्भासह राज्यातील अनेक भागात सध्या अतिवृष्टी व महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हजारो कुटुंबांची घरे पाण्याखाली गेली आहेत, शेतपिके वाहून गेली असून विद्यार्थी आपल्या कुटुंबीयांसह गंभीर परिस्थितीचा सामना करत आहेत. अशा वेळी 28 सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) राज्यसेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नुकतेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (DMER) पूरस्थिती लक्षात घेऊन आपली परीक्षा पुढे ढकलली. मात्र MPSC कडून विद्यार्थ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. हवामान खात्याने 28 सप्टेंबरसाठी रेड अलर्ट जारी केला असतानाही परीक्षा होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.
काँग्रेस खासदार विशाल पाटील यांनी याबाबत ट्विट करून विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीचा आदर करण्याची आणि 28 सप्टेंबर रोजीची परीक्षा तातडीने पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. परीक्षा काही दिवस पुढे गेल्यास आयोगाचे काही नुकसान होणार नाही, पण सध्याच्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला बसणे शक्य होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
MPSC कडून परीक्षेबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा: DLP अंतर्गत 42 रस्त्यांची दुरुस्ती, 17 रस्त्यांचे काम पूर्ण.