MPSC Exam Postponed | सांगली / मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) अखेर विद्यार्थ्यांच्या आणि विविध पक्षीय नेत्यांच्या मागणीची दखल घेतली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून विद्यार्थ्यांना प्रवासात अडचणी येत असल्याने येत्या 28 सप्टेंबर रोजी होणारी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
आयोगाने आज (26 सप्टेंबर) अधिकृत शुद्धिपत्रक जारी करत ही परीक्षा आता 9 नोव्हेंबर 2025 रोजी होणार असल्याचे जाहीर केले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच परीक्षार्थ्यांना सुरक्षिततेची काळजी घेता यावी, यासाठी हा निर्णय घेतल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
काल काँग्रेस खासदार विशाल पाटील यांनी ट्विट करून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर सामाजिक संस्था आणि विद्यार्थी संघटनांकडूनही सातत्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत होती. अखेर आयोगाच्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा: भुकेल्या लेकरांच्या आक्रोशाला सरकारच मौन – माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांची टीका.