Sangli Accident News Today | सांगली : आकाशवाणी केंद्राजवळ घडलेल्या दुर्दैवी अपघातात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. घरापासून काही अंतरावर असतानाच एसटी बसने धडक देत तिचा बळी घेतला.
मृत महिला शीतल प्रकाश आंब्रे (वय ४१) यांची ओळख पटली आहे. शीतल आंब्रे कामानिमित्त कोल्हापूरला गेल्या होत्या. काम आटोपून मंगळवारी संध्याकाळी त्या एसटीने सांगलीला परतल्या. रात्रीच्या सुमारास आकाशवाणी केंद्राजवळील थांब्यावर त्या उतरल्या. मात्र बस थांबलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे त्या बाजूने घराकडे निघाल्या. त्याचवेळी त्यांच्या मागून आलेल्या त्याच एसटी बसची धडक बसल्याने त्या खाली कोसळल्या आणि जागीच प्राण सोडले.
शेतमजुरी करून कुटुंबाची जबाबदारी पेलणाऱ्या शीतल आंब्रे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा जीव गेला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला.
🔴 हेही वाचा 👉 दामदुप्पट परताव्याच्या आमिषाने महिलेची १० लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.