सांगली : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी परिसरात शनिवारी सकाळी बिबट्याचा वावर पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. एका शेतातील नारळाच्या झाडावरून बिबट्या खाली उतरत असताना काही नागरिकांनी त्याला पाहिल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जोतिबा खिंड परिसरात उत्तम पाटील यांच्या शेतात सकाळच्या सुमारास नारळाच्या झाडावर बिबट्या चढलेला असल्याचे काही ग्रामस्थांच्या लक्षात आले. काही वेळातच बिबट्या झाडावरून खाली उतरताना दिसून आला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी सावधगिरीचा इशारा देत इतरांना माहिती दिली. काही नागरिकांनी या घटनेचे मोबाईलवर चित्रिकरणही केल्याचे सांगितले जात आहे.
येडेनिपाणी परिसर डोंगराळ भाग, दाट झाडी आणि ऊस शेतीने वेढलेला असल्यामुळे बिबट्याचा अधिवास वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गेल्या महिनाभरात या भागात बिबट्याचा तसेच त्याच्या पिलांचा वावर वारंवार दिसून आल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी याच परिसरात तरस दिसल्याचेही सांगण्यात आले.
बिबट्याच्या सततच्या दर्शनामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, विशेषतः रात्रीच्या वेळी शेतात जाण्याचे शेतकरी टाळत आहेत. ऊसतोड सुरू असल्याने फड मोकळे होत असून, त्यामुळे वन्यप्राणी नागरी वस्तीच्या दिशेने येत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर, येडेनिपाणी परिसरातील नागरिकांनी वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे तसेच आवश्यक असल्यास पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा: गाव पातळीवर प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न सुटणार? कवठेपिरानमधील नवा प्रकल्प चर्चेत.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










