Sangli Political News | सांगली : सांगलीच्या राजकारणात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांच्यात तीव्र शब्दयुद्ध रंगले आहे.
भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या कार्यालय उद्घाटनावेळी चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका करत, “मी फेकलेल्या टोप्या तुमच्या डोक्यावर कशा बसल्या?” असा सवाल उपस्थित केला. तसेच गोपीचंद पडळकर यांच्यावरील टीकेचे निमित्त करून जयंत पाटील फक्त प्रकाशझोतात येण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावर प्रत्युत्तर देताना जयंत पाटील यांनी सोशल मीडियावरून पलटवार केला. “जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे ही पालकमंत्र्यांची जबाबदारी आहे. वाचाळवीरांना वाचाळगिरीचे ज्ञान देण्याऐवजी जबाबदारी पार पाडावी,” अशा शब्दांत त्यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन बड्या नेत्यांमधील शब्दयुद्धामुळे सांगलीतील राजकीय वातावरण तापले आहे.
हेही वाचा: सांगली जिल्ह्याला मिळाल्या २५ फायबर ग्लास यांत्रिक बोटी.