मिरज : मिरज–पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर नागज फाट्याजवळ शुक्रवारी मध्यरात्री एक गंभीर प्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. RTO अधिकारी असल्याचे भासवून एका स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या व्यक्तींनी धान्याची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना जबरदस्तीने अडवून कांद्याची पोती उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी तालुक्यातील काही शेतकरी आपली कांद्याची वाहतूक बेळगावकडे करत असताना रात्री सुमारे २ वाजता नागज फाट्याजवळ त्यांची गाडी अडवण्यात आली. स्कॉर्पिओ वाहनातील व्यक्तींनी आपण RTO अधिकारी असल्याचे सांगत वाहनाची कागदपत्रे तपासली. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सर्व कागदपत्रे व्यवस्थित असूनही “ट्रकमधील पाच कांद्याची पोती द्या, अन्यथा गाडी पोलीस ठाण्यात जमा करू” अशी धमकी देण्यात आली.
या घटनेत संबंधित व्यक्तींनी कांद्याची पोती आपल्या खासगी स्कॉर्पिओ वाहनात टाकून तेथून निघून गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. संबंधित स्कॉर्पिओ वाहनाच्या मागील बाजूस ‘पोलीस’ असे लिहिलेले असल्याचेही शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस नागेश चव्हाण यांनी केली आहे. महामार्गावर अशा प्रकारे अधिकारी असल्याचे भासवून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्यास ती गंभीर बाब असून संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी, असे त्यांनी म्हटले आहे.
या घटनेप्रकरणी अद्याप पोलीस किंवा प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, शेतकरी संघटनांकडून या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात असून, महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
- जतचा दुष्काळ लवकरच संपणार? 65 गावांना पाणी, 26,500 हेक्टर सिंचनाचा मार्ग मोकळा
- राज्यात 2000 नवीन ग्रंथालयांना मान्यता; सांगलीतील ग्रंथोत्सवात पालकमंत्र्यांची घोषणा
- आटपाडीत दुकानफोडी; दिघंचीतील इलेक्ट्रिकल दुकान फोडून 70 हजारांचा माल लंपास
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर









