Palus News | पलूस (जि. सांगली) : पलूस शहरवासीयांची दीर्घकाळाची पाण्याची समस्या आता मार्गी लागणार आहे. तब्बल ३७ कोटी ४८ लाख खर्चाच्या स्वतंत्र नळ पाणी योजनेचा शुभारंभ मंगळवार, दि. २३ सप्टेंबर रोजी माजी मंत्री, आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते होणार आहे.
या योजनेमुळे दररोज ३० लाख लिटर क्षमतेच्या टाक्यांतून शुद्ध व मुबलक पाणी शहराला मिळणार असून पलूसच्या विकासातील हा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.
नगरपरिषदेचे माजी गटनेते सुहास पुदाले यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, डॉ. विश्वजित कदम यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच या योजनेला निधी मिळणे शक्य झाले. यावेळी पलूस सहकारी बँकेचे अध्यक्ष वैभव पुदाले, सोनाई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गणपतराव पुदाले, ज्येष्ठ नेते भारतसिंह इनामदार उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात डॉ. विश्वजित कदम यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत सरकारकडून या योजनेसाठी निधी मंजूर करून आणला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच पलूस शहराचे स्वतंत्र पाणी योजनेचे स्वप्न सत्यात उतरत आहे.
या प्रकल्पांतर्गत जॅकवेल, इन्टेक वेल, कनेक्टिंग पाईप, पंपिंग मशिनरी, विद्युत कामे, दाबनलिका, स्थिरीकरण टाकी यासह बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. शुद्धीकरण केंद्राचे सुमारे ७० टक्के काम प्रलंबित असून ते देखील लवकरच पूर्ण होणार आहे. सध्याच्या टप्प्यात स्थिरीकरण टाकीतून शुद्ध पाणी जुन्या टाक्यांमध्ये सोडून दररोज पुरवठा सुरू करण्याचे नियोजन आहे.
शासनाच्या मंजूर निधीपैकी १९ कोटी ४६ लाख रुपये आधीच प्राप्त झाले असून १५ कोटी ७५ लाख निधी मिळणे बाकी आहे. त्यामुळे शासनाने कामाच्या मुदतीस वाढ दिली असून २६ सप्टेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण होतील.
हेही वाचा: वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यात हंगामाचा शुभारंभ व बॉयलर अग्निप्रदीपन.