सांगली : कवठेमहांकाळ शहरात रविवारी मध्यरात्री धक्कादायक घटना घडली. बनावट आयकर अधिकारी असल्याचा बनाव करून चोरट्यांच्या टोळीने नामांकित डॉक्टरांच्या घरी घुसून कोट्यावधी रुपयांचे सोने व रोकड लंपास केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जगन्नाथ म्हेत्रे या नामांकित डॉक्टरांच्या घरी रात्री साडेअकराच्या सुमारास चार जणांनी (तीन पुरुष आणि एक महिला) आयकर विभागाचा बनाव करून प्रवेश केला. डॉक्टरांच्या झुरेवाडी रोडवरील निवासस्थानात त्यांनी छापा टाकल्याचा बनाव करत झडती घेतली. दरम्यान, अंदाजे दोन कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे सोने आणि रोकड घेऊन चोरट्यांनी पलायन केलेला.
घटनेनंतर डॉक्टरांनी पोलिसांना तातडीने माहिती दिली. रात्री उशिरा कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याचे पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी पाहणी करून प्राथमिक तपास सुरू केला आहे.
सीसीटीव्ही फुटेज तसेच परिसरातील साक्षीदारांच्या मदतीने बनावट आयकर अधिकाऱ्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून या घटनेमुळे कवठेमहांकाळसह संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.