सांगली : झरे (ता. आटपाडी) येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत झालेल्या दरोड्याचा छडा लावण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेशमधील मुख्य आरोपीसह एकूण चार जणांना अटक करण्यात आली असून, दरोड्यातील सुमारे ३ कोटी २५ लाख ५४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस तपासानुसार, ७ जानेवारी रोजी मध्यरात्री बँकेच्या शाखेत घुसखोरी करून गॅस कटरच्या साहाय्याने २२ लॉकर फोडण्यात आले होते. यामध्ये ग्राहकांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड चोरीस गेली होती. चोरीनंतर आरोपींनी बँकेतील सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआरही सोबत नेल्याने तपासात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या.
या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी घटनास्थळी आढळलेल्या गॅस कटरच्या साहित्याच्या आधारे तपासाची दिशा ठरवली. चौकशीदरम्यान उत्तर प्रदेशमध्ये तयार होणाऱ्या गॅस कटर सिलिंडरच्या पुरवठ्याचा माग काढत संशयितांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर वेगवेगळी पथके तयार करून उत्तर प्रदेश व सांगली जिल्ह्यात कारवाई करण्यात आली.
या कारवाईत राहुल रंजमीश शर्मा (रा. ककराला, जि. बधायू – उत्तर प्रदेश) याच्यासह विश्वजित विजय पाटील (रा. बांबवडे, ता. पलूस), संकेत अरुण जाधव (रा. बलवडी, ता. खानापूर) आणि इजाज राजू अत्तार (रा. आमणापूर, ता. पलूस) या चौघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 1 कोटी 57 लाख 68 हजार रुपये किमतीचे एक किलो 168 ग्रॅम सोन्याची लगड, 87 लाख रुपये किमतीचे 28 किलो चांदीचे दागिने, 70 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 10 लाख रुपये किमतीची कार, 26 हजार रुपयांचा गावठी कट्टा व जिवंत काडतूस, 9 हजार रुपये किमतीचा गॅस कटर सिलिंडरचा बाटला आणि 51 हजार 600 रुपयांच्या नोटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दरोड्यापूर्वी काही दिवस परिसरात मुक्काम करून बँकेची रेकी केली होती. दरोड्यानंतर चोरीतील दागिने विक्रीसाठी आणले असता सापळा रचून पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. या गुन्ह्यात आणखी काही संशयितांचा सहभाग असल्याची शक्यता असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा: प्रशासक काळात सांगली महापालिकेने काय केले? आयुक्त सत्यम गांधी यांनी सादर केले ‘रिपोर्ट कार्ड’.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










