Kavathe Mahankal Latest News Today | सांगली : कवठेमहांकाळ येथे आयकर अधिकारी असल्याचे भासवून छाप्याचा बनाव करत तब्बल एक कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याच्या प्रकरणात तपासाची गती वाढली आहे. पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले असून, संशयितांचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे.
ही घटना डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरात घडली होती. तोतया अधिकार्यांनी आयकर छाप्याचे नाटक करत घरातील १ किलो ४१० ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत ८४ लाख ६० हजार) आणि १५ लाख ५० हजार रुपयांची रोकड असा एकूण एक कोटी २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे, घरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील काढून नेत संशयितांनी आपला कोणताही ठसा राहू नये, याची काळजी घेतली होती.
तरीदेखील स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक आणि कवठेमहांकाळ पोलिसांच्या तपासात काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. याआधारे संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. तसेच, यापूर्वी महाराष्ट्रातील इतर ठिकाणी अशाच पद्धतीने घडलेल्या घटनांची माहितीही सांगली पोलिसांनी मिळवली आहे. त्या संशयितांचा सध्याचा ठावठिकाणा शोधण्याचे काम सुरू आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत आणि लवकरच या प्रकरणाचा छडा लागेल. तपासाबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात येत असून, कारवाईबाबतची अधिकृत माहिती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
🔴 हेही वाचा 👉 पॉलिशच्या बहाण्याने वृद्ध महिलेकडून तीन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एक आरोपी अटकेत, दोघे फरार.