सांगली : अल्पावधीत दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून जयसिंगपूर येथील एका महिलेची तब्बल दहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विश्रामबाग व यशवंतनगर परिसरातील तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अनुजा अभिजित पवार (वय ४२, रा. शिवशक्ती कॉलनी, जयसिंगपूर) यांची संशयितांशी आधीपासून ओळख होती. त्याचा गैरफायदा घेत, कमी कालावधीत गुंतवणुकीवर दुप्पट रक्कम देतो असे सांगत त्यांनी महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पवार यांनी १५ सप्टेंबर २०२२ पासून ११ सप्टेंबर २०२५ या कालावधीत दहा लाख रुपये गुंतवले. मात्र, ठरलेल्या मुदतीत परतावा मिळाला नाही.
रक्कम न मिळाल्यामुळे पवार यांनी वारंवार संशयितांकडे संपर्क साधून पैशाची मागणी केली. परंतु संशयितांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. तक्रारीनंतर संशयित उमेश जगन्नाथ जोशी (वय ४५), अस्मिता जोशी (वय ४०, रा. मुरली ॲपेक्स अपार्टमेंट, विश्रामबाग) आणि संतोष सुधाकर पाठक (वय ५४, रा. यशवंतनगर, सांगली) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
🔴 हेही वाचा 👉 बनावट आयकर अधिकार्यांचा बनाव करून कवठेमहांकाळच्या डॉक्टरांच्या घरी कोट्यवधींचा दरोडा.