Sangli Crime News in Marathi | सांगली : शहरातील शांतीनगर भागात रविवारी सकाळी कौटुंबिक वादातून नवऱ्याने झोपलेल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मृत विवाहितेचे नाव कोमल प्रशांत एडके असे असून, आरोपी पतीने धारदार चाकूने तिच्यावर सपासप वार करत जागीच संपवले. घटनेनंतर आरोपी प्रशांत एडके याने घराला बाहेरून कडी लावली आणि थेट शहर पोलिस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला.
माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होते. अनेकदा हा वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला होता; मात्र अनेकदा समजावूनही तो मिटला नाही. काही दिवसांपासून कोमल माहेरी मलकापूर येथे राहत होती. शनिवारी प्रशांतने तिला समजावून पुन्हा घरी आणले होते.
या घटनेनंतर शांतीनगर परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिस प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा: सांगलीतील भाजपची 1 ऑक्टोबरची इशारा सभा आता ऑनलाइन, पुरपरिस्थितीमुळे बदल.