सांगली : सांगली शहरात सार्वजनिक मुताऱ्या उपलब्ध असल्या तरी त्यांची अवस्था इतकी अस्वच्छ आणि विदारक आहे की नागरिकांना त्यांचा वापर करणे कठीण होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. शहरातील विविध भागांतील सार्वजनिक मुताऱ्यांमध्ये पाण्याची सुविधा नसणे, नियमित साफसफाईचा अभाव, तीव्र दुर्गंधी आणि आत साचलेली घाण यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून स्पष्ट झाले आहे.
अनेक ठिकाणी मुताऱ्यांमध्ये साचलेले घाण पाणी, निसरडी जमीन आणि असह्य दुर्गंधीमुळे आत पाय ठेवणेही कठीण झाले आहे. बहुतांश मुताऱ्यांमध्ये फ्लश किंवा पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने लघवीसाठी आलेल्या नागरिकांना नाईलाजाने परत फिरावे लागत असल्याची स्थिती आहे.

विशेषतः रिक्षाचालक, वाहनचालक, पादचारी, ज्येष्ठ नागरिक तसेच शहरात रोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. “सार्वजनिक मुताऱ्या आहेत, पण फक्त नावापुरत्याच,” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांची ही अवस्था गंभीर आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, २२ डिसेंबर २०२५ रोजी याच विषयावर बातमी प्रसिद्ध झाल्यानंतरही, आज ४ जानेवारी २०२६ रोजी शहरातील अनेक ठिकाणी परिस्थितीत कोणताही बदल झाल्याचे दिसून येत नाही. उलट, काही भागांमध्ये अस्वच्छतेची स्थिती अधिकच गंभीर झाल्याचे प्रत्यक्ष निरीक्षणातून समोर आले आहे. सांगली सिव्हिल हॉस्पिटल रोड, बसस्थानक परिसर आणि विशेषतः वर्दळीच्या ठिकाणांजवळील मुताऱ्यांची अवस्था चिंताजनक असल्याचे दिसते.
सार्वजनिक मुताऱ्यांतील ही अस्वच्छता केवळ असुविधेपुरती मर्यादित न राहता संसर्गजन्य आजारांचा धोका वाढवणारी ठरत असल्याची चिंता नागरिक व्यक्त करत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
दरम्यान, सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेच्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, सर्वच राजकीय पक्षांकडून विकास, स्वच्छता आणि स्मार्ट शहराबाबत मोठमोठी आश्वासने दिली जात आहेत. मात्र शहरातील सार्वजनिक मुताऱ्यांची ही दैन्यावस्था पाहता, प्रचारातील ‘स्वच्छ शहर’ आणि ‘नागरिक सुविधा’ या घोषणांचा वास्तवाशी किती मेळ आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
केवळ सुविधा उभारणे पुरेसे नसून, त्यांची नियमित देखभाल, पाण्याची कायमस्वरूपी सोय आणि स्वच्छता राखणे तितकेच आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. निवडणुकीनंतर तरी या मूलभूत नागरी समस्येकडे गांभीर्याने पाहिले जाईल का, आणि शहरातील सार्वजनिक मुताऱ्यांची प्रत्यक्ष स्थिती सुधारेल का, हाच खरा प्रश्न सांगलीकरांकडून उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा: मनपा शाळांच्या शहरस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्साह; १,००० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










