Sangli Politics News | सांगली : काँग्रेसचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “जत तालुक्यात करजगीत साप चाव्याने एक जीव गेला, बोर नदीत एका वृद्ध महिलेचा बुडून मृत्यू झाला, बिरनाळमध्ये एका तरुणाचा हृदयद्रावक मृत्यू झाला. अशा एकामागून एक दुर्देवी घटना घडल्या आहेत, पण आजही त्यांच्या वारसांच्या डोळ्यातले अश्रू पुसायला कोणी आलेल नाही.”
सावंत यांनी पुढे म्हटल की, “वारसांच्या घरात भुकेली लेकर आहेत, शेतकरी हतबल होऊन कर्जाच्या जाळ्यात अडकले आहेत आणि सत्ताधारी मात्र मौन बाळगून बसले आहेत. आपत्कालीन मदत निधीतून त्यांना तातडीची मदत मिळायला हवी होती, परंतु सात महिने उलटून गेले तरी त्यांना अजून एक रुपयाही मिळालेला नाही.”
सरकारच्या असंवेदनशीलतेवर टीका करताना त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “पूर्वी काही तासांत मदत पोहोचायची, पण आज सत्ताधाऱ्यांना गरीब जनतेकडे लक्ष द्यायला वेळ नाही. ही असंवेदनशीलता सहन केली जाणार नाही. जनतेचा संताप पेट घेतल्यास या सरकारला जनतेच्या रोषाला सामोर जाव लागेल.”
सावंत यांनी आपल्या पोस्टमध्ये शेवटी स्पष्ट शब्दांत म्हटल आहे की, “मी वारसांच्या न्यायासाठी, त्यांच्या हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देईन. सरकारने तातडीने जाग व्हाव, अन्यथा जनता उत्तर देईल.”
हेही वाचा : राज्यातील 30 हून अधिक जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला पावसाचा यलो अलर्ट.