Maharashtra Flood News | मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार पीडितांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट केले आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत पूरग्रस्त व शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बँकांनी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडून कर्जवसुली त्वरित थांबवावी, याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पूरग्रस्त कुटुंबांना तांदूळ, गहू, डाळी आणि आवश्यक जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू आहे.
केंद्र सरकार सोबतच राज्य सरकारकडूनही अतिरिक्त मदत केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विहिरींचे झालेले नुकसान, शेतीची माती वाहून जाणे अशा नुकसानीसाठी स्वतंत्र मदत पॅकेज देण्यात येईल. पुढील दोन ते तीन दिवसांत पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाणार आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, “केंद्राच्या मदतीची प्रतीक्षा न करता राज्य सरकारने आपल्या निधीतून मदत सुरू केली आहे. नंतर ही रक्कम ‘रिइम्बर्समेंट’ स्वरूपात केंद्राकडून मिळवता येईल.”
यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूर आणि बीड जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला होता. सोलापूरमध्ये आतापर्यंत ४ हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, ६,५०० हून अधिक लोकांना मदत छावण्यांत निवारा देण्यात आला आहे. या छावण्यांमध्ये अन्न, पाणी व आरोग्यसेवेची व्यवस्था करण्यात आली आहे.



