Sangli Crime News | मिरज : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात जानराववाडी येथे रविवारी रात्री धक्कादायक चोरीची घटना घडली. घरात घुसलेल्या चौघांनी चाकूच्या धाकाने एका महिलेचे दागिने लुटून पलायन केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार बाळासाहेब बाबू कवठेकर यांच्या घरात अज्ञात चोरटे घुसले. त्यांनी कवठेकर यांच्या पत्नी सजाक्का यांना चाकू दाखवून त्यांच्या गळ्यातील सुमारे २५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने काढून घेतले. ही घटना रविवारी, दि. २८ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान केली आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक नेमण्यात आले असून सीसीटीव्ही फूटेज तसेच स्थानिक माहितीच्या आधारे तपास सुरू आहे.
या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून गावात गस्त वाढवण्यात आली आहे.
हेही वाचा: लाडक्या बहिणींची डोकेदुखी वाढली.