Sangli News | आटपाडी : लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवून दोन कुटुंबांची तब्बल पाच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार आटपाडी तालुक्यात उघडकीस आला आहे. सुपारी फोडून लग्न ठरल्याचा देखावा उभा करत आरोपींनी विश्वास संपादन केला आणि काही दिवसांतच नवरीसह पसार झाले.
या प्रकरणी धनाजी शिवाजी कदम (वय 60, रा. कौठुळी, ता. आटपाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून धनाजी भीमराव शिंदे (रा. घाटनांद्रे, ता. कवठेमहांकाळ) आणि पोलू शंकर गिरी (रा. शेनीदळुप, ता. अर्धापूर, जि. नांदेड) यांच्याविरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या मुलासाठी योग्य मुलगी शोधून लग्न लावून देतो, असा दावा केला होता. त्यानुसार पोलू गिरीच्या मदतीने ‘आरती’ नावाच्या तरुणीला शितलादेवी मंदिर, बारड (ता. मुदखेड, जि. नांदेड) येथे आणण्यात आले. तेथे सुपारी फोडून लग्न ठरल्याचा देखावा उभा करत फिर्यादीकडून 2 लाख 50 हजार रुपये रोख स्वीकारण्यात आले.
मात्र लग्न होण्यापूर्वीच संबंधित तरुणी दिघंची येथून अचानक निघून गेली. संशय बळावल्यानंतर अधिक चौकशी केली असता, असाच प्रकार फिर्यादीचे पाहुणे दत्तात्रय सुभाष काशीद यांच्याबाबतही घडल्याचे उघड झाले. आरोपींनी त्यांच्याकडूनही लग्न लावण्याचे आमिष दाखवून 2 लाख 50 हजार रुपये उकळले होते. मात्र तीच तरुणी अवघ्या 30 ते 40 दिवसांत सासर सोडून पसार झाल्याचे समोर आले.
फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर धनाजी कदम यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. उपविभागीय पोलिस अधिकारी, विटा यांच्या लेखी परवानगीने 15 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा नोंदवण्यात आला असून, आरोपींच्या शोधासाठी पोलिस तपास सुरू आहे.
हेही वाचा: ९० कोटींच्या निधीत सांगलीला डावलले? कोल्हापूरसह पाच महापालिकांना लाभ, सांगलीच्या पदरात शून्य.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










