Sangli News | सांगली : मेंदूमृत रुग्णाच्या अवयवदानातून तीन रुग्णांना नवजीवन मिळाल्याची हृदयस्पर्शी घटना सांगलीत घडली आहे. हरिपूर (ता. मिरज) येथील रहिवासी श्री. दीपक आप्पासाहेब धर्माधिकारी (वय 69) यांच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या संवेदनशील निर्णयामुळे मृत्यूनंतरही त्यांचे अवयव इतरांसाठी जीवनदायक ठरले. या संपूर्ण प्रक्रियेत जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि आरोग्य यंत्रणेने दाखवलेला तत्पर व समन्वयित प्रतिसाद उल्लेखनीय ठरला.
दीपक धर्माधिकारी यांना मेंदूमध्ये तीव्र रक्तस्राव झाल्यानंतर मंगळवारी, 16 डिसेंबर रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असतानाच त्यांचा मेंदू मृत झाल्याचे स्पष्ट झाले. या अत्यंत दु:खद क्षणीही पत्नी दीपा, कन्या डॉ. श्रेया आणि पुत्र अभिनंदन धर्माधिकारी यांनी कुटुंबीयांच्या सहमतीने अवयवदानाचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे दीपक धर्माधिकारी यांचे यकृत, दोन्ही मूत्रपिंडे, डोळे व त्वचा दान करण्यात आली.
यकृत अवघ्या 25 मिनिटांत सांगलीहून कोल्हापूरला पोहोचवण्यात आले आणि तेथून विशेष विमानाने दीड तासांत नाशिक येथे पाठवण्यात आले. मूत्रपिंडे ग्रीन कॉरिडॉरद्वारे रुग्णवाहिकेतून नाशिकला रवाना करण्यात आली. वेळेचे अत्यंत काटेकोर नियोजन, वाहतूक नियंत्रण आणि वैद्यकीय पथकांचा समन्वय यामुळे ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
या प्रसंगी जिल्हाधिकारी अशोक काकडे दीपक धर्माधिकारी यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले की, “अवयवदानामुळे मृत्यूनंतरही एखादी व्यक्ती इतरांच्या आयुष्यात जिवंत राहते. हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी आहे.’ धर्माधिकारी कुटुंबाच्या या निर्णयामुळे समाजात अधिक जनजागृती होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या संपूर्ण उपक्रमात रुग्णालय प्रशासन, वैद्यकीय तज्ज्ञ, पोलीस यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन यांचा संवेदनशील व वेगवान समन्वय महत्त्वाचा ठरला. दीपक धर्माधिकारी यांचे आयुष्य जरी संपले असले, तरी त्यांच्या अवयवदानामुळे तीन जणांना नवे जीवन मिळाले असून, ही घटना समाजाला मानवतेचा खरा अर्थ सांगणारी ठरली आहे.
हेही वाचा: मिरजेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार गट) लढतीची शक्यता.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










