Sangli News | सांगली : सांगली शहरात सार्वजनिक मुताऱ्या उपलब्ध असल्या तरी त्यांची अवस्था इतकी अस्वच्छ आणि विदारक आहे की नागरिकांना त्यांचा वापर करणे कठीण झाले आहे. शहरातील विविध ठिकाणी असलेल्या मुताऱ्यांमध्ये पाण्याची सुविधा नसणे, नियमित साफसफाईचा अभाव, तीव्र दुर्गंधी आणि आत साचलेली घाण यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र प्रत्यक्ष पाहणीतून समोर आले आहे.
अनेक सार्वजनिक मुताऱ्यांमध्ये साचलेले घाण पाणी, निसरडी व दुर्गंधीयुक्त अवस्था असल्याने आत पाय ठेवणेही अवघड झाले आहे. बहुतांश ठिकाणी फ्लश किंवा पाण्याची कोणतीही सोय नसल्याने लघवीसाठी आलेल्या नागरिकांना नाईलाजाने परत फिरावे लागत आहे.
विशेषतः रिक्षाचालक, वाहनचालक, पादचारी, ज्येष्ठ नागरिक तसेच शहरात रोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. “सार्वजनिक मुताऱ्या आहेत, पण फक्त नावापुरत्याच,” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहांची गरज असताना अस्तित्वात असलेल्या सुविधांची ही अवस्था गंभीर बाब बनली आहे.
शहरात स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवले जात असले तरी सार्वजनिक मुताऱ्यांची ही स्थिती ‘स्वच्छ शहर’ आणि ‘स्मार्ट सिटी’च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. केवळ सुविधा उभारणे पुरेसे नसून, त्यांची नियमित देखभाल, पाण्याची कायमस्वरूपी सोय आणि स्वच्छता राखणे तितकेच आवश्यक आहे.
महापालिकेने शहरातील सर्व सार्वजनिक मुताऱ्यांची तातडीने पाहणी करून स्वच्छता, पाणीपुरवठा आणि देखभाल व्यवस्था सुधारावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा सुविधा असूनही त्या निरुपयोगी ठरत राहतील, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सांगली महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून सर्वच राजकीय पक्षांकडून विकास, स्वच्छता आणि स्मार्ट सुविधांबाबत मोठमोठी आश्वासने दिली जात आहेत. मात्र शहरातील सार्वजनिक मुताऱ्यांची ही दैन्यावस्था पाहता, निवडणूक घोषणांमधील ‘स्वच्छ शहर’ आणि ‘नागरिक सुविधा’ या मुद्द्यांचा वास्तवाशी किती मेळ आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. प्रचाराच्या गदारोळात रस्ते, पाणी, ड्रेनेजसारख्या मूलभूत प्रश्नांसह सार्वजनिक मुताऱ्यांसारख्या दैनंदिन गरजेच्या सुविधांकडे कोण लक्ष देणार, आणि निवडणुकीनंतर या समस्येवर प्रत्यक्ष उपाययोजना होतील का, हाच खरा प्रश्न असल्याची भावना शहरवासीयांमध्ये आहे.
हेही वाचा: विट्यात 45 वर्षांचा पाटील गटाचा गड कोसळला; शिवसेना (शिंदे गट) सत्तेवर, 22 जागांसह दणदणीत विजय.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










