सांगली : उत्पन्नवाढीसाठी आणि आर्थिक तूट कमी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सांगली विभागात स्वतःच्या जागेवर व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल, डिझेल तसेच सीएनजी विक्रीचे पंप सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्ह्यातील योग्य जागांची पाहणी व अभ्यास सुरू असल्याची माहिती विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली.
एसटी महामंडळाला सांगली जिल्ह्यात दररोज सुमारे 60 हजार लिटर डिझेलची आवश्यकता भासते. सध्या हे इंधन सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून खरेदी करण्यात येते. स्वतःचा पेट्रोल पंप उभारल्यास इंधन खरेदीदरम्यान होणाऱ्या कमिशन व इतर खर्चात बचत होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
महामंडळाच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत प्रवासी तिकीट विक्री असून, अनेक फेऱ्या विशेषतः शहरी बस सेवा सध्या तोट्यात असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त उत्पन्नाचे पर्याय शोधणे आवश्यक बनले असून, व्यावसायिक इंधन विक्री हा त्यातील एक पर्याय म्हणून पाहिला जात आहे.
एसटी महामंडळाकडे प्रत्येक डेपोत आधीपासूनच अंतर्गत वापरासाठी इंधन पंप असून, त्याच्या देखभालीचा अनुभव व प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध आहेत. त्यामुळे भविष्यात सर्वसामान्य ग्राहकांसाठी खुले असलेले पेट्रोल व डिझेल पंप सुरू करणे शक्य असल्याचे प्रशासनाचे मत आहे. यासोबतच सीएनजी विक्री आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पॉइंट्स उभारण्याचाही विचार करण्यात येत आहे.
इंधन विक्री पंपासाठी रस्त्यालगत व व्यावसायिकदृष्ट्या अनुकूल ठिकाणांची आवश्यकता असल्याने, एसटी महामंडळाच्या मालकीच्या जागांचे सर्वेक्षण सध्या सुरू असून, सर्वेक्षणानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










