सांगली : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या हप्त्यांच्या वितरणावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने या योजनेच्या डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ या दोन महिन्यांचे एकत्रित पैसे मतदानाच्या आधी वितरित करू नयेत, अशी मागणी करत राज्य निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे.
काँग्रेसच्या या पत्रावर भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी तीव्र प्रतिक्रिया देत काँग्रेसवर महिलाविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप केला असून, त्यांनी सोशल मीडियावर या पत्राचा निषेध व्यक्त केला आहे.
काँग्रेसच्या पत्रात काय म्हटले आहे?
१० जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की,
महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी दोन महिन्यांचे (डिसेंबर २०२५ व जानेवारी २०२६) ३,००० रुपये एकत्रित देण्याचा निर्णय हा १ कोटीहून अधिक महिला मतदारांवर परिणाम करू शकतो.
या पत्रात काँग्रेसने लाडकी बहीण योजनेला विरोध नसल्याचे स्पष्ट करत,
निवडणूक संपल्यानंतरच या योजनेचे हप्ते वितरित करण्याचे निर्देश शासनाला द्यावेत, अशी विनंती निवडणूक आयोगाकडे केली आहे. मतदानावर परिणाम होऊ शकतो आणि आदर्श आचारसंहितेचा भंग होतो, असा दावा पत्रात करण्यात आला आहे.
भाजप खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया
या पत्रावर प्रतिक्रिया देताना भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
‘लाडकी बहीण योजने’च्या हप्त्यांना विरोध करून काँग्रेसने महिलांविरोधी आणि विकासविरोधी भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महाडिक यांनी या योजनेमुळे सर्वसामान्य महिलांना आर्थिक आधार मिळत असल्याचे नमूद करत, राजकीय स्वार्थापोटी या योजनेच्या निधी वितरणास विरोध केल्याचा आरोप काँग्रेसवर केला आहे. महिलांच्या हक्कांशी खेळ करणाऱ्या या भूमिकेचा त्यांनी जाहीर निषेध केला आहे.
निवडणूक पार्श्वभूमी
सांगली, मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेसह राज्यातील अनेक महानगरपालिकांमध्ये १५ जानेवारी रोजी मतदान होत असून, या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांबाबतचा हा मुद्दा राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. या संदर्भात राज्य निवडणूक आयोग काय निर्णय घेतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: जिल्हा परिषद सांगलीच्या अधिकृत वेबसाइटवर नागरिकांसाठी सरकारी योजना, सूचना व महत्त्वाची माहिती उपलब्ध.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










