सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांच्या नियोजित विकासाला गती देण्यासाठी महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी नगररचना व उद्यान विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत प्रमुख रस्ते विकास, भूसंपादन प्रक्रिया आणि नागरी सुविधांच्या विस्तारासाठी ‘रोलिंग प्लॅन’ तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.
या बैठकीला उपायुक्त अश्विनी पाटील, सहाय्यक संचालक हणमंत मारनूर यांच्यासह नगररचना विभागातील शाखा अभियंते व कनिष्ठ अभियंते उपस्थित होते. शहरातील प्रलंबित रस्ते प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेत आयुक्तांनी कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या.
नगररचना विभागाला दिलेल्या निर्देशांनुसार सांगलीतील आलदर चौक ते धामणी शिव रस्ता, विजयनगर चौक ते कुंभार मळा रस्ता तसेच मिरजेतील १०० फुटी डी.पी. रोड (मिरज–पंढरपूर मार्ग ते म्हैशाळ उड्डाणपूल) या प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी तातडीने भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. विजयनगर–कुंभार मळा रस्त्यासाठी कुपवाड हद्दीतील ११५ बाधित मिळकतींच्या मालकी हक्काची प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
अनधिकृत बांधकामांबाबत कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी अभियंत्यांनी दररोज किमान एक तास क्षेत्रीय पाहणी करावी, तसेच दररोज किमान दहा नोटिसा देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
दरम्यान, शहरातील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी उद्यान विभागालाही नवे उद्दिष्ट देण्यात आले आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये दोन नवीन उद्याने विकसित करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, नव्या चिल्ड्रन पार्कसाठी योग्य जागा निश्चित करण्यास सांगण्यात आले आहे.
यासोबतच महापालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांचे ऑडिट करून आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वॉकिंग ट्रॅकजवळ कर्ब स्टोन बसवणे, नवीन जिम उपकरणे व खेळणी उभारण्यासह उद्यान विभागातील प्रलंबित निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
हेही वाचा: सांगली हिट अँड रन प्रकरण; जखमींची प्रकृती जाणून घेण्यासाठी पालकमंत्र्यांची रुग्णालयास भेट.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










