सांगली टुडे वृत्तसेवा: दिवाळीचा सण तोंडावर आला असताना घरातील साफसफाई, मुलांचे कपडे आणि फराळाच्या साहित्याची खरेदी करताना प्रत्येक गृहिणींची ओढाताण होत असते. अशा काळात राज्यभरातील लाखो लाडक्या बहिणींचे लक्ष आपल्या बँक खात्याकडे लागले आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता पुढच्या हफ्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी समोर येत असून, दिवाळीपूर्वी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
दोन ते तीन दिवसात खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता
राज्य सरकार सणासुदीच्या काळात महिलांना दिलासा देण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसात, म्हणजेच २७ ते २८ तारखेपर्यंत निधी वितरित करण्याचा विचार करत आहे. यापूर्वीही अनेक मोठ्या सणांच्या वेळी सरकारने वेळेआधी पैसे वर्ग केले होते. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत सामान्य कुटुंबातील महिलांचा आनंद द्विगुणित व्हावा, यासाठी येत्या दोन ते तीन दिवसात हप्ता बँकेत जमा केला जाण्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे.
खात्यात १५०० रुपये येणार की ३००० रुपये?
सध्या महिलांमध्ये सर्वात मोठी उत्सुकता ही आहे की खात्यात नियमित १५०० रुपये येणार की दोन्ही महिन्यांचे मिळून एकदम ३००० रुपये जमा होणार. मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे मिळून ३००० रुपये एकदम देण्याबाबतही पर्यायाचा विचार सुरू आहे. जर दोन्ही हप्ते एकदम जमा झाले, तर महिलांना सणासाठी थेट ३ हजार रुपयांचा हातभार लागेल. मात्र, याबाबत शासनाचा अंतिम शासन निर्णय (GR) किंवा अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे ३००० रुपये एकत्र मिळणार की नियमानुसार १५०० रुपयांचा हप्ता आधी येणार, हे येत्या दोन ते तीन दिवसांत स्पष्ट होईल.
महिलांनी ‘ही’ काळजी घेणे आवश्यक
काही वेळा शासनाकडून निधी वर्ग होऊनही बँक खात्याला आधार लिंक नसल्यामुळे किंवा ई-केवायसी अपूर्ण राहिल्याने पैसे अडकून पडतात. त्यामुळे ऐन दिवाळीत पैसे अडकू नयेत म्हणून महिलांनी आपले बँक खाते आधारशी जोडलेले आणि ‘डीबीटी’ (DBT) सक्रिय आहे की नाही, याची बँकेत जाऊन खात्री करून घेणे फायद्याचे ठरेल. जेणेकरून शासनाने पैसे सोडताच थेट खात्यात जमा होतील आणि दिवाळीचा सण कोणत्याही अडचणीविना आनंदात साजरा करता येईल.



