सांगली : जिल्हा परिषद व दहा पंचायत समित्यांसाठी शनिवारी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यात सरासरी 69.76 टक्के मतदान झाल्याची अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नऊ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीसाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला असून, संपूर्ण जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दिवसभर मतदानासाठी चुरस पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग संथ होता. सकाळी साडेसात ते साडेनऊ या कालावधीत अवघे 7.03 टक्के मतदान झाले होते. मात्र, सकाळी दहा वाजल्यानंतर मतदानाचा वेग हळूहळू वाढला. साडेअकरा वाजेपर्यंत 20.30 टक्के, दुपारी दीडपर्यंत 36.01 टक्के, तर दुपारी साडेतीनपर्यंत मतदानाची टक्केवारी 51.47 वर पोहोचली होती.
सायंकाळच्या सत्रात अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर संपूर्ण मतदान प्रक्रिया पूर्ण होताच जिल्ह्यात एकूण सरासरी 69.76 टक्के मतदान झाल्याचे स्पष्ट झाले.
उपलब्ध माहितीनुसार पलूस तालुक्यात सर्वाधिक 75.75 टक्के मतदान झाले. इतर तालुक्यांमध्येही समाधानकारक मतदान झाले असून, एकूणच जिल्ह्यातील मतदारांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दरम्यान, काही ठिकाणी किरकोळ वादाचे प्रकार घडले. आटपाडी तालुक्यातील काही गावांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाले, तर तासगाव तालुक्यातील चिंचणी येथे दोन गटांमध्ये बाचाबाची झाल्याची नोंद आहे. मिरज, जत तालुक्यात काही मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदारांना काही काळ प्रतीक्षा करावी लागली.
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी जिल्ह्यातील 2 हजारांहून अधिक मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतदान केंद्रांमध्ये मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर बंदी घालण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या या निवडणुकीसाठी एकूण 551 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. तालुकानिहाय मतमोजणी सोमवार, 9 फेब्रुवारी रोजी होणार असून या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: 9 फेब्रुवारीला 191 टेबलवर 122 फेऱ्यांत मतमोजणी; सांगली जिल्हा प्रशासन सज्ज.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










