मिरज : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी मिरज तालुक्यात शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळच्या वेळेत संथ असलेला मतदानाचा वेग दुपारनंतर वाढत गेला आणि अखेरीस तालुक्यात सरासरी 66 ते 67 टक्के मतदानाची नोंद झाली.
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 11 गटांसाठी तसेच पंचायत समितीच्या 22 गणांसाठी ही निवडणूक झाली. एकूण 3 लाख 2 हजार 694 मतदारांपैकी मोठ्या संख्येने मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष आणि महिला मतदारांचा सहभाग जवळपास समान प्रमाणात असल्याचे दिसून आले.
सकाळी अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी मर्यादित होती. मात्र दहा वाजल्यानंतर मतदानाचा वेग वाढू लागला. साडेअकरापर्यंत सुमारे 18 टक्के मतदान झाले होते. दुपारी दीड वाजेपर्यंत हा आकडा 32 टक्क्यांच्या पुढे गेला, तर साडेतीनपर्यंत जवळपास 47 टक्के मतदान झाले होते.
दिवसभरात बहुतांश मतदान केंद्रांवर प्रक्रिया शांततेत पार पडली. काही ठिकाणी किरकोळ वादावादीचे प्रकार घडले. हरिपूर, बेडग आणि नरवाड परिसरात काही काळ ईव्हीएम यंत्रांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र निवडणूक यंत्रणेने वेळीच हस्तक्षेप करून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू ठेवली.
जिल्हा परिषदेसाठी 37 तर पंचायत समितीसाठी 57 अशा एकूण 94 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. मिरज तालुक्याची मतमोजणी सोमवारी (दि. 9 फेब्रुवारी) शासकीय नवीन धान्य गोदाम (वैरण बाजार) येथे होणार असून निकालाबाबतची उत्सुकता वाढली आहे.
हेही वाचा: सांगली जिल्ह्यात 71 टक्के मतदान; पलूस तालुक्यात सर्वाधिक 75.69 टक्के मतदान.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










